Pune Coronavirus News : पुणे जिल्ह्यात नव्या स्ट्रेनचे 4 रुग्ण, रिकव्हरी रेट 96.24 %

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे जिल्ह्यात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये घट झाली असली तरी नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना राबवल्या जात आहेत. पुणे जिल्ह्यात आजपर्यंत 3 लाख 73 हजार 317 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये नव्या स्ट्रेनच्या चार रुग्णांचा समावेश असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत आहे. पुणे जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 3 लाख 59 हजार 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.24 टक्के इतके असल्याचे सौरभ राव यांनी सांगितले.

पुणे जिल्ह्यामध्ये सध्या 5 हजार 179 रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. या रुग्णांवर महापालिका आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस कमी होत आहे. आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 8 हजार 869 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात रुग्ण मृत्यू होण्याचे प्रमाण 2.38 टक्के इतके आहे. तर पुणे विभागात हेच प्रमाण 2.75 टक्के आहे. पुणे विभागात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.05 टक्के असून आजपर्यंत 5 लाख 54 हजार 240 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.