Pune News : पुण्याच्या प्रा.गोडबोले यांना फ्रान्सचा सर्वोच्च सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – फ्रान्सचा ‘नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट’ हा सर्वोच्च स्तरावरील सन्मान पुण्यातील ज्येष्ठ भौतिकशास्त्रज्ञ प्रा. रोहिणी गोडबोले यांना जाहीर झाला आहे. भारत – फ्रान्स यांच्यामधील संयुक्त संशोधनाचा विकास, तसेच मूलभूत विज्ञानात महिलांचे प्रमाण वाढावे यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी निवड करण्यात आली आहे. त्या सध्या सध्या बंगळरू येथील भारतीय विज्ञान संस्थेत (आयआयएस्सी) कार्यरत आहेत.

प्रा.गोडबोले यांचे शालेय शिक्षण पुण्यातील हुजूरपागा शाळेत झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण सर परशुराम महाविद्यालयातून झाले. त्यांनी 1972 साली बी.एस.सी.ची पदवी मिळवली, तेव्हा त्या तेंव्हाच्या पुणे विद्यापीठात पहिल्या आल्या होत्या. मुंबईच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेतून त्यांनी एम.एस.सी.ची पदवीही पहिल्या क्रमांकाने मिळवली. पुढे 1979 मध्ये अमेरिकेच्या स्टेट युनिव्हर्सिटी मधून त्यांनी पीएच्.डी. केले आहे.

पीएच्.डी. नंतर 3 वर्षे गोडबोले यांनी मुंबईत टाटा मूलभूत संशोधन संस्था मध्ये काम केले. नंतर 4 महिने मुंबईला रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये आणि 12 वर्षे मुंबई विद्यापीठात सुरुवातीला व्याख्याती आणि नंतर अधिव्याख्याती म्हणून काम केले.