गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा : API अंकुश माने

नीरा पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभुमीवर शासनाने यंदा गणेशोत्सव साजरा करताना नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांंनी गणेशोत्सव प्रतिकात्मक स्वरूपात व साध्या पद्धतीने साजरा करावा असे आवाहन जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांनी नीरा येथे केले.

नीरा (ता.पुरंदर) येथील राधाकृष्ण मंगल कार्यालयात नीरा पोलिस दुरक्षेत्रांंतर्गत येणाऱ्या गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आढावा बैठक मंगळवारी (दि.१८) जेजुरीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश माने यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मार्गदर्शन करताना अंकुश माने म्हणाले कि, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांंनी गणशोत्सव उत्सवाने आणि आनंदाने साजरा करताना तो प्रतिकात्मक स्वरुपात व साध्या पद्धतीने साजरा करावा. तसेच कोरोनाचा पादुर्भाव वाढू नये याकरिता मास्कचा वापर करावा, सामाजिक अंतर ठेवावे ,सॅनिटायझर, थर्मल स्कँनिंगचा वापर करावा. तसेच गणेशोत्सवा दरम्यान श्रींच्या मुर्तींची प्रतिष्ठापणा व विसर्जन करताना कोणतेही वाद्य वाजविण्यास किंवा वाजत गाजत मिरवणूक काढण्यास परवानगी नाही. गणेशोत्सवा दरम्यान पाच पेक्षा कमी लोकांची उपस्थिती असावी. कोणत्याही परिस्थितीत वर्गणीची सक्ती करण्यात येऊ नये. सार्वजनिक गणेश मंडळांंची मुर्ती चार फुटांची व घरगुती मुर्तीं दोन फुटापेक्षा उंच असणार नाही. तसेच प्रत्येक मंडळाने पोलिस स्टेशनसह ग्रामपंंचायतीची परवानगी घेणे अत्यंत आवश्यक व सक्तीचे आहे. तसेच गणेशोत्सव दरम्यान प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आँक्सिमिटर व थर्मल स्कँनिंग खरेदी करून घरोघरी नागरिकांचे तापमान, रक्तातील आँक्सिजनचे प्रमाण चेक करून कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यास मदत करण्याचे सामाजिक काम करावे.

यावेळी उपसरपंच विजय शिंदे, माजी सरपंच राजेश काकडे, ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण, बाळासाहेब भोसले, दिपक काकडे, शामराजे कुंभार, सुजाता जाधव, नीरेचे पोलिस पाटील राजेंद्र भास्कर, जेऊरचे पोलिस पाटील कुंडलिक तांबे, पिंपरेखुर्दचे पोलिस पाटील रूपाली सोनवणे , पत्रकार, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
फौजदार विजय वाघमारे यांनी स्वागत व सुत्रसंचालन केले. तर पोलिस हवालदार सुदर्शन होळकर यांनी आभार मानले.

एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवावी
नीरा व परिसरातील मंडळानी एक गाव एक गणपतीची संकल्पना राबवावी असे आवाहन सपोनि अंकुश माने यांनी केले. त्याला माजी सरपंच राजेश काकडे व ग्रा.पं.सदस्य अनिल चव्हाण यांनी प्रतिसाद देत गावातील मंडळाच्या पदाधिका-यांची येत्या दोन दिवसात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.