समता, बंधुता आणि एकजूट राज्याची सर्वात मोठी ताकद : पालकमंत्री गिरीश बापट

पुणे: पोलीसनामा ऑनलाईन

समता, बंधुता आणि एकजूट हिच राज्याची सर्वात मोठी ताकद असून परस्परांच्या धर्माचा, पंथाचा आदर करण्याची भावना आणि एकजूट देशाला आणि राज्याला पुढे घेऊन जाईल, असा विश्वास पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे ध्वजारोहण झाले, त्यावेळी ते बोलत होते. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर झालेल्या या कार्यक्रमास महापौर मुक्ता टिळक, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, प्रभारी विभागीय आयुक्त अनिल कवडे, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी  पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले, जलयुक्त्‍  शिवार अभियानांतर्गत सन 2018-19 या वर्षाकरीता 226 गावे निवडण्यात आली असून यासाठीचा आराखडा तयार करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी अभियानातंर्गत 2015-16 मध्ये उत्कृष्‍ट योगदानाबद्दल पुरंदर  तालुक्याला राज्य पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. त्याचबरोबर राज्य पातळीवरील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुणे जिल्ह्यास  दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. जलयुक्त शिवार कार्यक्रमामध्ये मागील वर्षाप्रमाणे चालू वर्षीही  जिल्हा  राज्यात अग्रेसर राहील, असा विश्वास व्यक्त केला.

या कार्यक्रमात पोलीस दल, गृह रक्षक दल, नागरी संरक्षक दलाने पालकमंत्री गिरीश बापट यांना मानवंदना दिली. पोलीस दल, गृह रक्षक दल, नागरी संरक्षक दल इ. दलाच्या पथकांनी शानदार संचलन केले. यावेळी वीर मरण प्राप्त झालेल्या शहिद जवानांच्या वीर पत्नीस एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बससेवांमधून आजीवन मोफत प्रवास सवलत योजनेच्या पासचे वितरण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान 2016-17 अंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती, लघुउद्योग क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या संस्था, पोलीस विभाग, महसूल विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले.

यावेळी लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, विविध विभागांचे पदाधिकारी, राज्यस्तरीय अधिकारी, आयुक्त, उपायुक्त तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.