खडकवासला कालव्याजवळ आढळला चिमुकलीचा मृतदेह, प्रचंड खळबळ

पुणेः पोलीसनामा ऑनलाईन – एका पाच ते सात महिन्याच्या चिमुकलीचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह खडकवासला कालव्याजवळ आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शुक्रवारी (दि. 26) मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आली. मृतदेह पूर्णपणे सडलेला असून शीर धडावेगळे झालेले आहे. मृतदेहाजवळ चिमुकलीच्या दुधाची बाटली पडलेली आहे. चार-पाच दिवसांच्या अगोदर हा मृतदेह झुडपात टाकला असावा अशी शक्यता वर्तवली जात आहे.

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांनी या घटनेची माहिती कालव्यावर पोहण्यासाठी आलेल्या तरुणांना दिली. त्यानंतर खडकवासला येथील सामाजिक कार्यकर्ते कुणाल सरवदे यांनी तात्काळ ही माहिती हवेली पोलिसांना दिली. हवेली पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक ऋतुजा मोहिते, होमगार्ड जवान शांताराम राठोड, प्रवीण घुले, सत्यम काळे खडकवासला गावचे पोलीस पाटील ऋषिकेश मते घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही सुरु केली आहे.