Pune News : पुण्यात महावितरणच्या वरिष्ठ  तंत्रज्ञाची गळफास घेऊन आत्महत्या

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – नऱ्हे -धायरी येथील महावितरणच्या कार्यालया शेजारी असलेल्या गोडाऊनमध्ये  एका वरिष्ठ तंत्रज्ञाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. उमेश प्रकाश दिक्षीवंत  (वय ३२, रा. फिनोलेक्स कॉलनी, काळेवाडी, पिंपरी चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या महावितरण कर्मचाऱ्याचे नाव आहे. दरम्यान त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही.

दिलेली अधिक माहिती अशी की, गेल्या दोन वर्षांपासून उमेश दिक्षीवंत हे महावितरणच्या धायरी शाखेत कार्यरत होते. सध्या त्यांची रात्रपाळीत ड्युटी होती. शनिवारी रात्री ११ वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले होते.  इतर कर्मचारी कामात मग्न असताना दिक्षीवंत हे कार्यालयाशेजारी असणाऱ्या गोडावून मध्ये गेले. दरम्यान एक कर्मचारी सकाळी सातच्या सुमारास गोडाऊनमध्ये काही कामानिमित्त जात असताना त्यांना आतून दरवाजा बंद असल्याचे लक्षात आले. त्यावेळी त्यांनी दिक्षीवंत यांना  आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद , मिळाला नाही.  त्यांच्या सहकाऱ्याने खिडकीतून पाहिले असता त्यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. कर्मचाऱ्यांनी तातडीने वरिष्ठांना याबाबत माहिती कळविली. त्यानंतर पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. छताला असणाऱ्या लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने दिक्षीवंत यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले.

मुलीचा  वाढदिवस अन  वडिलांची आत्महत्या
उमेश दिक्षीवंत मूळचे उस्मानाबाद जिल्हयातील असून दोन वर्षांपूर्वीच कोल्हापूरवरून बदली होऊन महावितरणच्या धायरी शाखेत रुजू झाले होते. दोन वर्षांपूर्वीच  त्यांचा विवाह झाला होता

ते काळेवाडी परिसरात आपल्या पत्नीसमवेत राहत होते. त्यांना एक वर्षाची मुलगी असून तिचा पहिला वाढदिवस नुकताच झाला होता.  दिक्षीवंत यांनी आत्महत्या केल्याने कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.