आठवलेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी

सातारा : पोलीसनामा आॅनलाइन – केंद्रीय समाजकल्याणमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे प्रवीण गोसावी नामक युवकाने हल्ला केला. त्याचे पडसाद साताऱ्यातही उमटले. शाहू चौकात रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाच्या ब्ल्यू फोर्स आणि रिपाइंने साताऱ्यात निदर्शने, निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली. ब्ल्यू फोर्सच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच आठवले यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली.

साताऱ्यातील शाहू चौकात झालेल्या निदर्शनावेळी रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, सातारा तालुकाध्यक्ष आप्पा तुपे, सचिन वायदंडे तसेच अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या ब्ल्यू फोर्सच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, मदन खंकाळ, बाबा ओव्हाळ, सागर सावंत, सिद्धार्थ समिंदर, किरण बगाडे, अमित मोरे, सिद्धार्थ काकडे तसेच अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते. आठवले साहेब के सन्मान मे ब्ल्यू फोर्स मैदान मे, रिपाइंचा विजय असो, हल्लेखोराला फासावर लटकवा, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

पत्रकारांशी बोलताना दादासाहेब म्हणाले, आमचे नेते मंत्री रामदास आठवलेंवर हल्ला करणारा गोसावी मनुवादी विचारसरणीचा होता. आठवले यांच्या वाढत्या लोकप्रियतेचे पोटशूळ उठले आहे. या हल्ल्याला पोलिसही तेवढेच जबाबदार आहेत. ज्यांनी हल्ला केला त्यांनी स्वत:ची लायकी तपासावी, दलित चळवळीचा भुतकाळ आठवावा. आठवले यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी. तर अशोक गायकवाड म्हणाले, आठवलेंच्यावर जो हल्ला झाला. त्याच्या निषेधार्थ आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. हल्ला करणारा आंबेडकर चळवळीचा कायकर्ता होवूच शकत नाही.