Made in India लस कोवॅक्सिन घेतलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही, ‘सीरम’च्या कोविशील्डला मात्र दिलासा

बंगळुरू : वृत्तसंस्था – देशात कोरोनाने थैमान घातले आहे. वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी देशात लसीकरण मोहीम जोरात सुरु आहे. लसीकरण अभियानात कोवॅक्सिन आणि कोविशील्डचा प्रामुख्याने वापर केला जात आहे. येत्या काळात आंतरराष्ट्रीय प्रवास करताना लस घेतली आहे का, ही बाब तपासली जाणार असून याबाबतीत कोविशील्डला मोठा दिलासा मिळाला आहे. तर कोवॅक्सिनला धक्का बसला आहे.

जगभरातील अनेक देशांनी लस घेतलेल्या व्यक्तीसाठी प्रवासाचे धोरण जाहीर केले आहे. यात कोवॅक्सिनचे दोन्ही डोस घेतलेल्या प्रवाशांचा समावेश केला नाही. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे. त्यामुळे पुढचे काही महिने तरी कोवॅक्सिन घेतलेल्या भारतीयांना विदेशात जाता येणार नाही. कोवॅक्सिनची निर्मिती भारत बायोटेकने केली आहे. जगभरातील देश लसीकरण झालेल्या प्रवाशांना प्रवेश देण्याआधी काही महत्त्वाच्या निकषांचा विचार करतात. प्रवासी ज्या देशात येत आहे, त्या देशातील नियामक संस्थेने मंजूर केलेल्या किंवा WHO ने आपत्कालीन वापराच्या यादीत समावेश केलेल्या लसींचे डोस घेतले असल्यासच प्रवेश दिला जाणार आहे. सीरमने तयार केलेल्या कोविशील्ड, मॉडर्ना, फायझर, ऍस्ट्रोझेनेका, सिनोफार्म, बीबीआयपी, जनसेन यांचा समावेश WHO ने आपत्कालीन वापराच्या यादीत केला आहे. मात्र या यादीत अद्याप तरी कोवॅक्सिनचा समावेश झाला नाही.यादीत स्वत:चा समावेश करून घेण्यासाठी भारत बायोटेकने प्रयत्न सुरु केले असून मे-जूनमध्ये बैठक होणार असल्याची माहिती WHO ने दिली.