गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांसाठी रात्रभर बैठका ; ‘ही’ नावे आघाडीवर

पणजी : वृत्तसंस्था – गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यामधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.  भाजपाने नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेण्यासाठी रात्रभर आमदारांसोबत बैठका घेतल्या. या बैठकीला मित्र पक्ष आणि काही अपक्ष आमदारही उपस्थित होते. गोवा प्रदेश काँग्रेसचे नेते गिरीश चोडणकर आणि चंद्रकांत कवळेकर यांनी शनिवारीच राज्यपाल मृदुला सिन्हा यांना पत्र लिहून सत्तास्थापनेचा दावा केला आहे.

गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार असून, त्यात गोवा फॉरवर्ड पक्ष, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. या पक्षांनी केवळ पर्रिकर यांच्यासाठीच सरकारला पाठिंबा दिला आहे. आता पर्रिकर यांच्या निधनामुळे हे पक्ष कोणती भूमिका घेतात हे महत्त्वाचे ठरणार आहे. नव्या मुख्यमंत्र्यांना विधानसभा सभागृहात बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याने आघाडीतील पक्षांची भूमिका खूप महत्वाची ठरणार आहे. काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी मध्यरात्री गोव्यामध्ये दाखल झाले. गडकरींच्या उपस्थितीत मॅरेथॉन बैठक पार पडली. पहाटेपर्यंत या बैठकीत मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही तोडगा निघू शकलेला नाही.

गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी पक्षाच्या आमदारांसह नितीन गडकरींची भेट घेतली आहे. गोवा विधानसभा सभापती प्रमोद सावंत यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी सध्या आघाडीवर आहे. श्रीपाद नाईक यांचेही नाव चर्चेत होते. मात्र भाजपाच्या मित्र पक्षांचा नाईक यांना विरोध आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे नेते विजय सरदेसाई यांनी आमच्यासाठी सर्व पर्याय खुले असल्याचं म्हटले आहे. ‘आम्ही मनोहर पर्रिकर यांना समर्थन दिले होते. भाजपाला नाही, पर्रिकरांच्या निधनानंतर भाजपा आता काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर आम्ही आमचा निर्णय जाहीर करू’ असे सरदेसाई यांनी सांगितले. मगोपचे सुदीन ढवळीकर यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला आहे. मगोपने सत्तास्थापनेसाठी भाजपाला पाठिंबा दिला होता. आम्ही बऱ्याचदा भाजपाला पाठिंबा दिला आहे. आता भाजपाने आम्हाला मुख्यमंत्रीपदावर संधी द्यावी, अशी मागणी मगोपने केल्याचे विधानसभेतील उपसभापती मायकल लोबो यांनी सांगितले.