सोन्याच्या दरानं इतिहासात पहिल्यांदाच गाठली ‘उच्चांकी’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्याच्या किमतीत रोजमितीला चढ – उतार होतच असते. मात्र देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच सोनं प्रति १० ग्रॅमसाठी ४३ हजार रुपयांच्या पार गेलं आहे. गुरूवारी राजधानी दिल्लीत सराफा बाजारामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव तब्बल ७०० रूपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम ४३,१७० रूपयांवर पोहचला आहे. तज्ज्ञांचं मत आहे की, सध्या लग्नसराईचा मोसम चालू आहे. तसेच कोरोना व्हायरसमुळे जागतिक बाजारात निर्माण झालेल्या अस्थैर्यामुळं सोन्याकडे वळलेली गुंतवणूकदारांची नजर यामुळे सोन्याचे भाव कडाडले आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सलग सहाव्या दिवशी मोठी वाढ सोन्याच्या किंमतीमध्ये दिसून आली आहे.

मुंबईसह देशातील अनेक प्रमुख शहरांमध्ये बुधवारी सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम सरासरी ४५० रुपयांनी वाढ झाली होती. सोन्याबरोबरच चांदीचा भाव देखील किलोमागे ५०० ते १,००० रुपयांनी वधारला आहे. गुरूवारी चांदीचा दर प्रतिकिलो ४८,६०० रूपये इतका होता. सोन्याच्या दरात झालेली वाढ ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय रूपयांची किंमत घसरल्यामुळे झाल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

मागील ८ दिवसांमध्ये सोन्याच्या भावात १५०० रुपयांनी वाढ झाली आहे. सोन्याच्या पाठोपाठ चांदीच्या दरात देखील वाढ झाल्याचे समोर येत आहे. तज्ज्ञांच्या मते, लग्नसराईमुळे सोन्याच्या भावात अजून वाढ होण्याचे चिन्ह दिसत आहेत.

चीनमधील प्राणघातक कोरोना विषाणूच्या भीतीमुळे सोन्याचे भाव कडाडले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेल्या किमती आणि लग्नसराईमुळे सोन्याच्या मागणीत झालेली वाढ, याचा फटका देशांतर्गत सराफ बाजारातही पाहायला मिळत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रति औंस (२८.३४ ग्रॅम) सोन्याची किंमत १,६०२ डॉलर इतकी झाली आहे.