सोन्याने गाठला 10 महिन्यांतील ‘नीचांक’, जाणून घ्या आजचा दर

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा गुरुवार व शुक्रवार असे सलग दोन दिवस मोठी घसरण झाली. गेल्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात 1 हजार 200 रुपयांनी घसरण होऊन ते 45 हजार 300 रुपये प्रतितोळ्यावर आले आहे, तर दुसरीकडे चांदीही तब्बल 3 हजार 500 रुपयांनी घसरून 66 हजार 500 रुपये प्रतिकिलोवर आली. गेल्या 10 महिन्यांतील सोन्याचा हा नीचांकी दर आहे. 7 मे 2020 रोजी सोने 45 हजारांचा पल्ला ओलांडून 46 हजारांवर पोहाेचले होते.

गेल्या 10 दिवसांमध्ये दोन दिवसांचा अपवाद वगळता सोन्या-चांदीत सातत्याने घसरण सुरू आहे. दररोज घसरण होत असल्याने सोने मे महिन्यानंतर प्रथमच 46 हजारांच्या खाली आले आहे. गेल्या वर्षी 2020 मध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्या-चांदीच्या भावात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. त्यानंतर कोरोना संकट आणि आर्थिक अनिश्चिततेमुळे जागतिक पातळीवर बड्या संस्थांनी सोन्यामध्ये मोठी गुंतवणूक केली होती. ऑगस्ट 2020 मध्ये कमॉडिटी बाजारात सोने 56 हजार 200 रुपयांवर गेले होते. मात्र, कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे संशोधन झाले आणि सोन्यातील तेजी फिकी पडू लागली. ऑगस्टनंतर सोन्याच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे.