Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त, कमॉडिटी बाजारात जोरदार नफा वसुली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोने ( Gold) आणि चांदीच्या ( Silver) दरात आज मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये ( Multi Commodity Exchange) ३६२ रुपयांची घसरण झाली आहे. सध्या सोन्याचा भाव प्रतीतोळा ५१२३६ रुपये आहे. चांदीच्या किमतीत देखील १५३६ रुपयांची घसरण झाली असून एक किलोचा भाव ६११४९ रुपये झाला आहे. एका वेबसाइटनुसार ( Website) बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रतीतोळा ४९९६० रुपये आहे, तर २४ कॅरेटचा भाव ५०९६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेटचा भाव ४९३१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५२७९० रुपये आहे.

कोलकात्यात ग्राहकांना २२ कॅरेट सोने खरेदीसाठी ४९७६० रुपये मोजावे लागत आहेत. तर २४ कॅरेटचा भाव ५२९६० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने प्रती १० ग्रॅमसाठी ४७७१० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२०४० रुपये आहे. सोमवार आणि मंगळावर अशा दोन्ही दिवशी बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात घसरण झाली होती. अमेरिकेत मतमोजणीला सुरुवात झाली असून, तत्पूर्वी स्पॉट गोल्डच्या दरात किरकोळ बदल झाला. स्पॉट गोल्डचा भाव प्रती औंस १८९४ डॉलरवर आहे. चांदीचा भाव प्रती औंस २४ डॉलर आहे. बहुतांश देशांनी नव्याने लॉकडाउन लावल्याने बाजाराच्या जोखीमेवर परिणाम होऊन गुंतवणूकदार सोन्याकडे वळाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.

अमेरिकेच्या निवडणुकीत ( US Election) काही राज्ये ही पारंपरिकदृष्ट्या डेमोक्रॅटीक आणि रिपब्लिक पक्षांसाठी बालेकिल्ला समजली जातात. तर काही राज्यांचा कल कोणत्याही निवडणुकीत स्पष्ट नसतो. अशा राज्यांना ‘स्विंग स्टेट’ ( Swing Test) म्हणतात, अशी १२ राज्ये आहेत. त्यातील १२ पैकी १० राज्यांनी चार वर्षांपूर्वी ट्रम्प यांच्या पारड्यात मतदाने केले होते. त्यामुळे ट्रम्प यांचा विजय त्यावेळी सोपा झाला होता. त्यामुळे यावेळी सर्वांचे लक्ष या राज्यांकडे लागले आहे. दरम्यान, अमेरिकन राष्ट्रध्यक्ष निवडणुकीच्या निकालानंतर आणखी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यावेळी या निवडणुकीत कुणाचा विजय होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.