Google ने Play store वरून हटवले 100 हून जास्त पर्सनल Loan Apps

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युजर्सच्या सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करणारे अनेक अ‍ॅप्स गुगलने (Google ) भारतात प्ले स्टोरवरून हटवले आहेत. हे अ‍ॅप्स सेफ्टी पॉलिसीचे उल्लंघन करून ऑनलाइन लोन सर्विस देत होते. याआधीही गुगलने धोकादायक असणारे अ‍ॅप्स युजर्सच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हटवले आहे. गुगलने आपल्या एका ब्लॉगमधून ही माहिती दिली आहे. गुगलने जवळपास 100 हून जास्त पर्सनल लोन अ‍ॅप्सवर धडक कारवाई केली आहे.

सरकार आणि युजर्सकडून दिलेल्या माहितीच्या आधारावर गुगलने ही कारवाई केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक युजर्स शॉर्ट टर्म लोन देणाऱ्या कंपन्यांविरोधात तक्रार करीत होते. अनेक कंपन्या लोनसाठी युजर्सला त्रास देत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. तर काही कंपन्या पर्सनल लोन देण्याच्या नावाखाली कॉन्टॅक्ट डिटेल्स अ‍ॅक्सेस करीत होती. काहींनी तर वसूली एजन्टकडून धमकावले जात असल्याच्या तक्रारी सुद्धा केल्या होत्या. अशाच वेळी गुगलने हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे.

फिनटेक एक्सपर्ट श्रीकांत एल यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुगलने गेल्या दहा दिवसांत कमीत कमी 118 डिजिटल लोन अ‍ॅप्सला हटवले आहे. गुगलने पर्सनल लोन देणा-या असंख्य कंपन्यांना कशा पद्धतीने लोकल कायदा आणि रेग्युलेशनला फॉलो करत आहेत याबाबत विचारणा केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी गुगलने आणखी तीन अ‍ॅप्स हटवले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे हे अ‍ॅप्स लहान मुलांची माहिती गोळा करत असल्याचं समोर आलं आहे. मुलाचा डेटा चोरी करीत असल्याचा आरोप या तीन अ‍ॅप्सवर करण्यात आला आहे.