पेट्रोल बाईकला ‘या’ सरकारी कर्मचाऱ्याने बनविले इलेक्ट्रॉनिक, आता अवघ्या 7 रुपयांत चालणार 35 किलोमीटर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे त्रस्त होऊन बैतूल विद्युत विभागात तैनात असलेल्या लाइन हेल्परने चांगलाच जुगाड केला आहे. 100 रुपयांत चाळीस किलोमीटर घावणारी त्याची बाईक आता अवघ्या 7 रूपये खर्चात 35 किमीचा प्रवास करत आहे. उषाकांत असे या सरकारी कर्मचाऱ्याचे नाव आहे. ज्याने आपल्या जुन्या पेट्रोल बाईकचे इलेक्ट्रिक बाईकमध्ये रुपांतर केले. ही बाईक प्रदूषणमुक्त असून पेट्रोलशिवाय चालते.

उषाकांत हा बैतूल येथील विद्युत विभागात लाइनमॅन आहे. उषाकांत म्हणतात की, माझ्याकडे 18 वर्ष जुनी बाईक होती, जिला त्यांनी इलेक्ट्रिक बाइक बनविली. यात 12 वॅट्सच्या 4 बॅटरी तसेच मोटर आहे, ज्यावर ही बाइक चालते. ही बाइक 6 तासात चार्ज होते. दुचाकी चार्ज करण्यासाठी विजेच्या एका युनिटचा वापर केला जातो. एकदा चार्ज झाल्यावर बाईक 35 किमी धावते. प्रत्यक्षात हा एक आश्चर्यकारक प्रयोग आहे की, 7 रुपयांच्या एका युनिटमध्ये दुचाकी 35 किमी चालते. उषाकांत म्हणतात की, वाढत्या महागाईत प्रत्येक वस्तू महाग आहे. नवीन बाईक खरेदी करण्यासाठी 90 हजार ते एक लाख रुपये खर्च येतो. हे पाहताच त्यांनी जुन्या बाईकला इलेक्ट्रिक बनवलं, ज्यामुळे पेट्रोलची बचत होते आणि प्रदूषण देखील होत नाही.

उषाकांत मित्र दयारामसह त्यांच्या गावातून कार्यालयात ये-जा करतात. ते सांगतात की, जर त्याने आपली जुनी दुचाकी भंगारात विकली असती तर त्याला फारच कमी पैसे मिळाले असते. बाईक जुनी होती आणि त्याची नोंदणीही संपली होती, म्हणून बाईकमध्ये 28 हजार रुपये खरंच करून ती इलेक्ट्रिक बनवली. आधी पेट्रोलच्या बाइक्समुळे दररोज 80 ते 100 रुपये खर्च होत होता, आता महिन्याला दोन ते अडीच हजार रुपये वाचतात.