ग्राहकांचा कल ऑनलाईन खरेदीकडे वाढला, टिकाऊपणासह स्वच्छतेला प्राधान्य

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – काेराेनामुळे ग्राहकांच्या सवयीत (Consumer Trends) मोठा बदल झाल्याचे एका सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्या आत्मसात करून आवश्यक बदल करण्याचे माेठे आव्हान विक्रेत्यांसमाेर आहे. नाशवंत वस्तू जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी माेठ्या प्रमाणावर शीतगृह उभारण्याची गरज सर्वेक्षणातून आलेल्या माहितीनंतर आधोरेखित झाले आहे. इमर्सन कमर्शियल ॲण्ड रेसिडेन्शियल साेल्युशन्स या कंपनीतर्फे जगातील नऊ देशांमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून ग्राहकांच्या बदललेल्या सवयींची माहिती समाेर आली.

काेराेनामुळे वस्तूच्या किमतीपेक्षा काही मूलभूत गाेष्टींबाबत ग्राहक काळजी घेताना दिसत आहेत. ग्राहक स्वच्छतेवर जास्त भर देत आहेत. चांगल्या शीतगृहांची साेय आहे की नाही, याकडेही ग्राहक लक्ष देत असल्याचे आढळून आले आहे. सुमारे 72 टक्के लाेकांनी काेराेना महामारीनंतर सुपरमार्केट, हायपर मार्केट, किराणा दुकाने यांसारख्या पारंपरिक खरेदीकडे वळणार असल्याचे सांगितले. या ठिकाणी ताजे पदार्थ पूर्वीप्रमाणे मिळतील, असा त्यांना विश्वास आहे, तर दुसरीकडे बहुतांश भारतीय आणि चिनी ग्राहकांनी मात्र ऑनलाइन किराणा आणि इतर पदार्थ ऑनलाइन माध्यमातून खरेदी( online-shopping) यापुढेही कायम ठेवणार असल्याचे सांगितले.

घरीच जेवणास पसंती
काेराेना महामारी येण्याच्या पूर्वी अनेकजणांचा हॉटेलमध्ये जेवण करण्याचा कल होता. परंतु, आता हाॅटेल्स उघडल्यानंतरही घरीच अन्न शिजवून खाण्यावर लाेकांचा भर असल्याचे आढळले आहे. दक्षिण आफ्रिका, भारत, फिलिपाइन्स, ऑस्ट्रेलिया आणि इंडाेनेशियातील 60 ते 80 टक्के लाेकांनी रेस्टाॅरंटऐवजी घरीच जेवण्यास पसंती दिली आहे. ताजे अन्न खरेदीसाठीही माेठ्या प्रमाणावर ऑनलाइन माध्यमांचा उपयाेग करणार असल्याचे 52 टक्के भारतीय सांगतात, तर सुपरमार्केट आणि माॅल्समध्ये स्वच्छता, दर्जा आणि अन्नाची पूर्वीपेक्षा जास्त काळजी घेत असल्याचे निरीक्षण 82 टक्के लाेकांनी नाेंदविल्याचे समोर आले आहे.