आता पर्यटकांना हडसर गड सर करणे झाले सोपे

जुन्नर : पोलीसनामा ऑनलाईन – ऐतिहासिक हडसर उर्फ पर्वतगडावर मरहट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुपच्या वतीने दिशादर्शक व माहितीफलक लावल्याने गडावर फिरणे आता सोपे झाले आहे. दुर्ग संवर्धनात अग्रेसर असणा-या शिवाजी ट्रेल या संस्थेच्या मार्गदशर्नाखाली किल्ले हडसरवर महरट्टे सह्याद्रीचे दुर्ग संवर्धन ग्रुपच्या दुर्ग संवर्धकांनी रविवारी (दि. 6) हडसर गडाची ऐतिहासिक माहिती देणारा फलक, तसेच दिशादर्शक फलक लावला आहे.

हडसर येथे येणा-या पर्यटकांना तसेच दुर्गप्रेंमीना, शिवप्रेमींना गडावरील वास्तू शोधणे जिकरीचे होत असे. कारण या गडावरील बहुतांश वास्तू जमिनीशी समतल आहेत. त्यामुळे ते शोधणे अडचणीचे होत होते. गडावरील प्रत्येक माहिती अगदी सहजपणे आणि कमी वेळात उपलब्ध व्हावी, या उद्देश्याने हा फलक लावलण्यात आल्याचे संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले. यावेळी शिवाजी ट्रेलचे विश्वस्त विनायक खोत, वनपाल शशिकांत मडके, मरहट्टे सह्याद्रीचे अमोल ढोबळे, सचिन गीते, राहुल चौधरी, उध्दव चौधरी, निलेश काळे, आशिष जाधव, विनोद पाटील, गजानन सस्ते, सुमंत मौर्य यांच्या उपस्थितीत फलकाचे पूजन व अनावरण करण्यात आले. यावेळी गडावर उपस्थित शिवप्रेमी, पर्यटकांनी सर्वांचे कौतुक करत संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या.