पॉर्न फिल्म रॅकेटचे गुजरात ‘कनेक्शन’ उघड, एकाला अटक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  काही दिवसांपूर्वी पॉर्न फिल्म रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफास केला होता. पॉर्न फिल्म रॅकेटमध्ये दररोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. या पॉर्न रॅकेटचं गुजरात कनेक्शन उघडकीस आलं आहे. याप्रकरणी पोलिसांच्या मालमत्ता कक्षाने एका 40 वर्षीय व्यक्तीला सुरत येथून अटक केली आहे. तन्वीर हाश्मी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नाव असून या प्रकरणातील ही नववी अटक आहे.

तन्वीर हाश्मीला न्यायालयात हजर करण्यात आले. पॉर्न फिल्म प्रॉडक्शनप्रकरणी गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने अटक केलेल्या अभिनित्री गहना वशिष्ठला एका व्हिडीओमागे लाखो रुपये मिळत होते. यामध्ये मध्यस्थी म्हणून काम करणाऱ्या उमेश कामतच्या सोमवारी मुसक्या आवळल्या. सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या विआन इंडस्ट्रीज लि. कंपनीचा तो व्यवस्थापकीय संचालक आहे. या सेक्स रॅकेटचं जाळे परदेशात देखील पसरल्याची माहिती आता समोर आली आहे. नोकरी गेल्यानंतर उमेश कामत याने पॉर्नच्या धंद्यात शिरला. परदेशी अ‍ॅपला पॉर्न फिल्म विकून त्याने आणि गहना हिने कोट्यावधी रुपये कमावले होते.

या प्रकरणात मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मालमत्ता कक्षाच्या चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, पॉर्न व्हिडीओसाठी कामतने एक अ‍ॅप तयार केले होते, आणि त्याद्वारे व्हिडीओ अपलोड करत होता. गहनाकडून आलेले व्हिडीओ कुठे व कसे शेअर करायचे यासाठी तो मध्यस्थ म्हणून काम पहात होता. कामत हा विआन इंडस्ट्रीजमध्ये कामाला असल्याने यामध्ये विआनचे काही कनेक्शन आहे का ? फंडिंग कोण करत होते ? याचा तपास केला जात आहे. गरज पडल्यास राज कुंद्रा यांची देखील चौकशी होऊ शकते. सध्या कामत हा पोलीस कोठडीत आहे.

पॉर्न लिंक शेअर करण्यासाठी व्ही ट्रान्सफरचा वापर करण्यात येत होता. यामध्यामातून दोन जीबी फाइल्स मोफत शेअर केल्या जाऊ शकतात. तसेच यातील डाटा सात दिवसांत आपोआप डिलिट होत असल्याने पॉर्न रॅकेटमधील लोक लिंक शेअर करण्यासाठी व्ही ट्रान्सफरचा वापर करीत होते.