सातारा : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर (वय 92) यांचे बुधवारी (दि. 31) वृद्धापकाळाने निधन झाले. पळसावडे (ता. माण) येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यामागे 3 मुले आणि 1 मुलगी असा परिवार आहे.
गुणाबाई जानकर यांचे मूळगाव सातारा जिल्ह्यातील धनगरवाडी होय. त्यांनी शिक्षण घेतलेले नसले तरी आपल्या मुलांना उच्च शिक्षित करण्यासाठी मोठे योगदान दिले. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्यांनी मुलांचा सांभाळ करून त्यांना उच्च शिक्षित केले. जानकर यांच्या संघर्षाच्या काळात आईने त्यांना साथ दिली. जानकर हे मंत्री झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्याशेजारील निवासस्थानी राहण्याची संधी त्यांना मिळाली. त्यांच्या कष्टाचे चीज झाले, अशीच भावना त्या वेळी सर्वांनी व्यक्त केली होती. जानकर यांनीही आपल्या आतापर्यंतच्या राजकीय प्रवासात आईचे आशिर्वाद होते, असे आवर्जून सांगत होते.