‘या’ खास गोष्टीसाठी स्वयंघोषित गुरू राम रहीमचा ‘पॅरोल’साठी अर्ज

रोहतक (हरियाणा ) : वृत्तसंस्था – आश्रमात दोन साध्वींवर अत्याचार केल्याप्रकरणी हरियाणाच्या रोहतक जेलमध्ये शिक्षा भोगत असलेल्या स्वयंघोषित गुरू आणि डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमने पॅरोल मिळवण्यासाठी अर्ज केला आहे.  मात्र त्याने पॅरोल मिळवण्यासाठी अजबच कारण दिले आहे. शेतीवाडीकडे लक्ष देण्यासाठी त्याने सुट्टी मागितली आहे. बाबा राम रहीम गेल्या २३ महिन्यांपासून जेलमध्ये शिक्षा भोगत आहे.

राम रहीमच्या पॅरोल संदर्भात सुनारिया जेलचे  अधीक्षक सुनील सांगवान यांनी डिप्टी कमिशनर अशोक गर्ग यांच्याकडून अहवाल मागितला आहे. त्यामध्ये राम रहीम यांना पॅरोल देणे योग्य आहे का अशी विचारणा करण्यात आलेली आहे. दरम्यान यापूर्वीही राम रहीमने मानलेल्या मुलीच्या लग्नामध्ये सामील होता यावे यासाठी पॅरोल अर्ज केला होता. मात्र हरियाणा हायकोर्टाने तो फेटाळला होता.

या प्रकरणांत दोषी आहे राम रहीम

बाबा राम रहीमने २००२ साली आपल्या सिरसा आश्रमामध्ये दोन साध्वींवर अत्याचार केले होते. त्याची तक्रार एका साध्वीने तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे केली होती. त्यांनी ते प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी पाठविले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी बाबाने, तसेच काही राजकारण्यांनी अधिका-यांवर दबाव आणण्याचाही प्रयत्न केला होता, मात्र  अधिका-यांनी दबाव झुकारून तपास पूर्ण केला आणि बाबावर खटले दाखल करण्यात आले. याप्रकरणात दोषी ठरवून त्याला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

याशिवाय पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्येप्रकरणी राम रहीम याला विशेष सीबीआय न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. छत्रपती आपल्या वर्तमानपत्रामध्ये डेराशी संबंधित माहिती प्रसिद्ध करायचे. २००२ मध्ये पत्रकार छत्रपती यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हे प्रकरण सीबीआयकडे गेल्यानंतर या प्रकरणी हत्येनंतर तब्बल पाच वर्षांनी २००७ मध्ये आरोपपत्र दाखल झाले. राम रहीमवर या हत्येचा कट रचण्याचा गुन्हा दाखल झाला.  या हत्येनंतर तब्बल १६ वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला.

महत्त्वाच्या बातम्या
विधासभेच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर करणार मोठी घोषणा, आज घेणार पत्रकारपरिषद

राज्यातील ओबीसींची जनगणना करण्याची मागणी

वाराणसी आता मांसाहाराच्या सेवनावर बंदी

‘किडनी’ घ्या पण, बियाणे द्या, विधानसभेत धनंजय मुंडेंनी मांडली शेतकऱ्याची व्यथा