Birthday SPL : कधी वेटर, तर कधी केलं बेकरीत काम, ‘या’ व्यक्तीला भेटल्यानंतर बदललं बोमन इराणीचं नशीब !

पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडमधील फेमस अ‍ॅक्टर बोमन इराणी (Boman Irani) आज (बुधवार, दि. 2 डिसेंबर) त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. बोमनचा जन्म 2 डिसेंबर 1959 रोजी झाला होता. त्यांनी वयाच्या 42 व्या वर्षी करिअरला सुरुवात केली होती. परंतु ते फेमस अ‍ॅक्टर्सपैकी एक आहेत. आज आपण त्यांच्या आयुष्याबद्दल काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

अ‍ॅक्टिंग सोबत फोटोग्राफीचाही छंद

खूप कमी लोकांना माहीत आहे की, बोमनला अ‍ॅक्टिंग सोबत फोटोग्राफीचाही छंद आहे. जेव्हा ते बारावीत होते तेव्हा शाळेतील क्रिकेट मॅचचे फोटो तेच काढत असे. प्रोफेशनल म्हणून त्यांनी पुण्यात पहिल्यांदा बाईक रेसची फोटोग्राफी केली होती. यानंतर त्यांनी मुंबईतील बॉक्सिंग वर्ल्ड कप कव्हर केला.

वेटर म्हणूनही केलं काम

शिक्षण पूर्ण केल्यानंतर बोमन इराणीनं मुंबईतील हॉटेल ताजमध्ये 2 वर्षे काम केलं. बोमन वेटर आणि रूम सर्व्हिस स्टाफ म्हणून काम करत होते. काही कारणांमुळं 2 वर्षांत त्यांना ही नोकरी सोडावी लागली. यानंतर ते कुटुंबासोबत काम करू लागले. बोमन आपल्या आईसोबत बेकरीच्या दुकानात 14 वर्षे काम करत राहिले. अशातच एकदा त्यांची भेट कोरियोग्राफर श्यामक डावर सोबत झाली. यानंतर त्यांचं नशीबच पालटलं. श्यामकनं बोमनला थिएटरमध्ये काम करण्याचा सल्ला दिला.

या सिनेमांनी दिली ओळख

बोमन यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर 2001 साली त्यांनी 2 इंग्रजी सिनेमात काम केलं. एव्हरीबडी सेज आय एम फाईन आणि लेट्स टॉक अशी या सिनेमांची नावं आहेत. 2003 साली आलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या सिनेमातून त्यांना खरी ओळख मिळाली. आतापर्यंत बोमननं 50 हून अधिक सिनेमात काम केलं आहे. यात हनिमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., दोस्ताना, युवराज, थ्री इडियट्स्, तीन पत्ती, हम तुम और घोस्ट, हाऊसफुल, हाऊसफुल 2 आणि संजू अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.