राजकीय ‘धुरळा’ ! आईविरोधात 11 वी तील मुलानं उभं केलं वडिलांच ‘पॅनल’

कन्नड/औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – पुण्यातील ज्येष्ठ दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरणी कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना अटक करण्यात आली आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायतची रणधुमाळी सुरु झाली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव राजकारणात पुन्हा सक्रिय होत असल्याची घोषणा त्यांचे सुपुत्र आदित्य जाधव यांनी केली आहे. या ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत रायभान जाधव यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रीय झाली असून आदित्य जाधव यांनी मंगळवारी कन्नड येथे पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. वडील अटकेत असताना स्वत: सर्व सूत्र हातात घेतली आहेत.

आदित्य जाधव याने केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आणि आई संजना जाधव यांच्या विरोधात हर्षवर्धन यांचे पॅनल उभे करत आपल्या राजकीय वाटचाल सुरु केल्याने राजकारणातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून सर्व कार्यकर्ते सोबत असल्याचे आदित्य यांनी म्हटले आहे.

अकरावीत असलेल्या आदित्यने ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पत्रकारांनी विचारलेल्या खोचक प्रश्नांना अतिशय समर्पक उत्तरे दिली. अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान, बंद पडलेली मका खरेदी यासारख्या अनेक समस्यांचा सामना सध्या शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हर्षवर्धन जाधव हे शेतकऱ्यांसाठी राजकारणात सक्रिय होत असून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती निवडणुका लढवणार असल्याची घोषणा आदित्य जाधवने केली आहे. तसेच जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आदित्यने म्हटले.

पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांना आदित्यने समर्पक उत्तरे दिली. तर पाशोरी येथील ग्रामपंचायत मध्ये हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलचा प्रचार करणार असाल तर तेथे आई रंजना जाधव यांचेही पॅनल असणार आहे. यावर आदित्यने सांगितले की, संविधानाने सर्वांना निवडणुकीत उभा राहण्याचा हक्क दिलेला आहे. त्यामुळे कुणी निवडणुकीला सामोरे जावे हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. संविधानाने त्यांना तो दिलेला हक्क असून त्या त्यांचा हक्क बजावत असतील तर त्यात वावगे काय ? असे समपर्क उत्तर दिले.