हायकोर्टानं फेटाळली एकता कपूरची याचिका ! वेब सीरिजबद्दल वाढल्या निर्मातीच्या अडचणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – ओटीटी प्लॅटफॉर्म अल्ट बालाजी (ALTBalaji) वरील वेब सीरिज ट्रीपल एक्स सीजन 2 (XXX season 2) मधील विवादित दृश्यांमुळं दाखल झालेली एफआयआर रद्द करण्यासाठी प्रोड्युसर एकता कपूर (Ekta Kapoor) कडून दाखल करण्यात आलेली याचिका मध्य प्रदेश हायकोर्टानं (Madhya Pradesh High Court) फेटाळली आहे. इंदोर खंडपीठानं बुधवारी दिलेल्या 65 पानांच्या निर्णयात असं आढळलं की, प्रतिवादींनी धार्मिक भावना दुखावल्या नाहीत.

5 महिन्यांपूर्वीच प्रोड्युसर एकता कपूर विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. यात असा आरोप करण्यात आला होता की, तिची ट्रीपल एक्स ही वेब सीरिज अश्लीलता तर पसरवत आहेच सोबतच धार्मिक भावनाही दुखावत आहे. यानंतर तिच्याविरोधात आयटी अ‍ॅक्ट आणि आयपीसीमधील कलमांनुसार एफआयआर दाखल करण्यात आली होती.

न्यायमूर्ती शैलेंद्र शुक्ला यांच्या एकल खंडपीठानं म्हटलं की, तथ्य असे नाहीत की, कोर्ट सीआरपीसीमधील कलम 482 अंतर्गत आपल्या विशेष शक्तींचा वापर करत किमान माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम 67 व 67 ए आणि भा दं वि कलम 294 (अश्लीलता) अंतर्गत दाखल केलेली एफआयआर रद्द करू शकतं. परंतु हे सांगणं योग्य ठरेल की, आयपीसीमधील कलम 298 ची तरतूद आणि राज्य प्रतीक कायद्याच्या तरतुदीचं उल्लंघन केल्याचं आढळून आलेलं नाही.

इंदोरमधील रहिवाशी नीरज यागनिक आणि वाल्मीक साकरगाये यांनी अन्नपूर्णा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.