Black Fungus : कोविड-19 ने संक्रमित न होता सुद्धा होऊ शकते का ब्लॅक फंगस इन्फेक्शन?, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  कोविड-19 महामारीच्या दुसर्‍या लाटेशी अजूनही देश सामना करत आहे. आतापर्यंत देशात फंगस इन्फेक्शनची 9000 हज़ारपेक्षा जास्त प्रकरणे समोर आली आहेत. ज्यामुळे ब्लॅक फंगसला सुद्धा अनेक राज्यांनी महामारी घोषित केले आहे. ब्लॅक फंगल किंवा म्यूकोर-मायकोसिस एक दुर्मिळ फंगल इन्फेक्शन आहे. हा संसर्ग कमजोर प्रतिकारशक्ती आणि गंभीर आजाराने ग्रस्त लोकांना होतो. कोरोनातून बरे झालेल्या किंवा उपचार घेत असलेल्या रूग्णांमध्ये हा संसर्ग जास्त आढळून येत आहे. मात्र, काही एक्सपर्टचे म्हणणे आहे की, ब्लॅक फंगस इन्फेक्शन त्या लोकांमध्ये सुद्धा दिसून आले ज्यांना कोविड-19 संसर्ग झाला नाही.

कुणाला ब्लॅक फंगस होण्याचा धोका?

ब्लॅक फंगस संसर्ग निर्माण करणारे जीवाणू नेहमीच पर्यावरणात असतात, विशेषकरून मातीत आणि सडणारे कार्बनिक पदार्थ जसे की पाने, खताचे ढीग, सडलेल्या लाकडात. परंतु हे केवळ कमजोर प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांनाच संक्रमित करते. निरोगी लोकांना कोणताही धोका नाही. मधुमेहाने ग्रस्त लोकांना याचा जास्त धोका असतो.

ब्लॅक फंगस कसा संक्रमित करतो

इम्युनिटी कमजोर असलेल्या व्यक्तीच्या श्वासाद्वारे वातावरणात असलेले जीवाणू श्वसनप्रणालीत प्रवेश करतात आणि सायनस किंवा फुफ्फुसाला प्रभावित करतात. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत गंभीर रूग्णांना स्टेरॉईड्स दिले जात आहे. ज्यामुळे इम्युनिटी कमजोर होते आणि हा दुर्मिळ संसर्ग होऊ लागतो.

फंगल इंफेक्शन होणे म्हणजे कोविड पॉझिटिव्ह होणे आहे का?

कोरोना व्हायरस आणि ब्लॅक फंगल इंफेक्शन एकाच वेळी होऊ शकत नाही. एक्सपर्टनुसार, ब्लॅक फंगस तेव्हाच होतो जेव्हा व्यक्तीच्या शरीरातील संसर्ग नष्ट होतो. कोविड संसर्गाच्या 14 दिवसानंतर रूग्णाला अँटी-वायरल ट्रीटमेंटची आवश्यकता नसते, केवळ ब्लॅक फंगसचा उपचार झाला पाहिजे. 14 दिवसानंतर सुद्धा आरटी-पीसीआरमध्ये शरीरात व्हायरस दिसू शकतो, परंतु यास चुकीचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मानले जाते.