Coronavirus : ‘होम आयसोलेशन’साठी केंद्राची नवी ‘मार्गदर्शक’ सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या कोरोनाच्या रुग्णांमध्ये अतिशय कमी प्रमाणात लागण झाल्याचे स्पष्ट झाले असेल, किंवा कोरोनापूर्व लक्षणे आढळून आली असतील, अशा रुग्णांना घरात आयसोलेशनमध्ये राहणे गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अशा रुग्णांसाठी अतिरिक्त मार्गदर्शक सूचना (गाइडलाइन्स) जारी केल्या आहेत.

घरी आयसोलेशनमध्ये कोणाला राहण्याची आवश्यकता ?

– ज्या रुग्णाला सौम्य प्रकारची कोरोनाची लागण झाली असेल, किंवा ज्या व्यक्तीमध्ये कोरोनापूर्व लक्षणे आढळली असल्याचे निदान डॉक्टरांनी केले असेल, अशा रुग्णाला घरात आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात येतो.

– अशा रुग्णाला किंवा व्यक्तीला 24 तास सेवा पुरवण्यासाठी कोणतीही काळजीवाहू उपलब्ध असणे आवश्यक आहे. अशा काळजीवाहू व्यक्तीचा संपूर्ण आयसोलेशनच्या काळात रुग्णालयाशी सततचा संपर्क आवश्यक आहे.

– अशा व्यक्तीच्या घरामध्ये आयसोलेशनमध्ये राहता येऊ शकले अशी स्थिती व सुविधा घरामध्ये असणे गरजेचे आहे.

होम क्वारंटाईनमध्ये घ्यावयाची काळजी

– काळजी घेणारी व्यक्ती आणि जवळून संपर्कात असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी सांगितल्यानुसार आणि प्रोटोकॉलनुसार हायड्रोक्सिक्लोरोक्वीन ही औषधाची गोळी घेणे आवश्यक आहे.

– मोबाईल फोनमध्ये आरोग्या सेतू हे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करणे आवश्यक असून ते कायमचे अ‍ॅक्टीव्ह ठेवणे आवश्यक आहे.

– रुग्णाला सेल्फ आयसोलेशनचे हमीपत्र भरणे आवश्यक असून क्वारंटाईनबाबतच्या मार्गदर्शक सूचना पाळणे गरजेचे आहे.

– रुग्णाला जिल्हास्तरीय सर्व्हिलन्स अधिकाऱ्याकडून आपल्या तब्येतीची नियमित तपासणी करून घेणे बंधनकारक आहे.

दरम्यान, या मार्गदर्शक सूचनांनुसार, कंटेंटमेंट टप्प्यात, मध्यम किंवा गंभीर म्हणून निश्चित केलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर किंवा कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. कोरोनाच्या अतिशय सौम्य किंवा पूर्व-लक्षणात्मक म्हणून निदान झालेल्या रुग्णांनाच घरी आयसोलेशनमध्ये ठेवण्याची परवानगी आहे.