विवाहाच्या अमिषाने संबंध ठेवणे हा बलात्कारच : उच्च न्यायालय

भोपाळ : वृत्तसंस्था
आपण तिच्याशी विवाह करणार नाही, हे माहिती असतानाही तिला विवाहाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणे ही फसवणूकच आहे त्यामुळे हा बलात्कारच असल्याचा निर्वाळा, मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने देत एका तरुणाची याचिका फेटाळली.

भोपाळमध्ये नृत्याचे वर्ग चालविणाऱ्या एका महिलेने राजीव शर्मा याच्यावर गुन्हा दाखल केला होता. ही महिला आणि राजीव शर्मा यांची फेसबुकवर ओळख झाली व पुढे त्याचे प्रेमात रुपांतर झाले शर्मा याने या महिलेला लग्नाची मागणी घातली. तिने तयारी दाखविल्याने त्यांचे लग्नही ठरले होते पण शर्माच्या आईचा मात्र या लग्नाला विरोध होता. आईचा विरोध असला तरी आपण तुझ्याशीच लग्न करणार असे त्याने आश्वासन दिले होते. त्यानंतर शर्मा याने या महिलेकडे शरीरसंबंधांची मागणी केली त्यानंतर त्याने विवाह करायला नकार दिला. या महिलेने शर्माविरोधात बलात्काराची फिर्याद दाखल केल्यावर त्याविरोधा शर्मा याने उच्च न्यायालयात धाव घेतली होती़ शरीरसंबंधांना तिची संमती होती़ त्यामुळे याला बलात्कार म्हणता येणार नाही, असा त्याचा युक्तिवादी होता.
यावर न्यायालयाने निर्णय देताना सांगितले की, महिलेचे शरीर हे पुरुषाचे खेळणे नाही. विवाहाचे आश्वासन देऊन शरीर संबंधांची संमती मिळविल्याने ही फसवणूकच ठरते शर्मा याने केलेले कृत्य निंद्यनीय व शिक्षा होण्यासारखे असल्याचे सांगत त्याचा अर्ज फेटाळून लावला.