लोणी काळभोरमध्ये रोडरोमीओंची धुलाई

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – विनाकारण महाविद्यालयांसमोर घिरट्या घालणाऱ्या रोडरोमीओंना लोणी काळभोर पोलिसांनी चांगलाच दणका दिला. उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाबाहेर विनाकारण फिरणाऱ्या २४ रोडरोमिओंवर पोलिसांनी शुक्रवारी चांगलीच धुलाई केली.

पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई महाविद्यालयाच्या महाविद्यालयात प्रवेश नसतानाही, महाविद्यालयाच्या परिसरात तसेच महाविद्यालयाच्या बाहेर काही तरुण मंडळी घुटमळते. शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरात प्रवेश करून आवारात फिरणाऱ्यांची ओळखपत्रे तपासण्यास सुरुवात केली. आणि त्यांच्याकडे असणाऱ्या वाहनांच्या कागदपत्रेही तपासली. यात २४ रोडरोमिओ विनाकारण महाविद्यालयाच्या आवारात फिरताना आढळले. पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात नेऊन त्यांच्या पालकांना बोलवून घेतले आणि आपल्या मुलांचे प्रताप त्यांच्या कानावर घातले. त्यांना समज देऊन सोडण्यात आले.

शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश नसतानादेखील विनाकारण बाहेर टवाळखोर आणि टारगट तरुणांची गर्दी पाहायला मिळते. वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजविणे, स्टंटबाजी करणे, मुलींची छेड काढणे असे प्रकार ही मुलं करत असतात. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवतो म्हणून अशा रोडरोमिओंवर वेळोवेळी कायदेशीर कठोर कारवाई करणे अत्यंत गरजेचे झाले आहे. त्यासाठीच आजची कारवाई करण्यात आली. असे सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा हुलवान यानी सांगितले. यावेळी त्यांनी विद्यार्थीनींशी संवादही साधला.