Honour Killing : कुटुंबीयांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने बाप, भाऊ अन् जावायाने मिळून केली तरुणीची हत्या, सामाजिक प्रतिष्ठेसाठी केलं कृत्य

यवतमाळः पोलीसनामा ऑनलाइन – घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न केल्याने बाप, भाऊ, जावयाने मिळून एका तरुणीची हत्या केल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात उघडकीस आली आहे. 10 दिवसापूर्वी एका विहिरीत तरुणीचा मृतदेह आढळला होता. तिने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज होता. पण पण शवविच्छेदन अहवालात वेगळाच प्रकार समोर आला. तरुणीचा आधी गळा आवळून हत्या केली अन् त्यानंतर तिचा मृतदेह विहिरीत ढकलल्याचे समोर आले आहे. त्यानंतर पोलिसांनी कुटुंबीयांची कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनी सामाजिक प्रतिष्ठेसाठी हत्या केल्याचे कबूल केले आहे.

रेखा शेडमाके (पेंढरी, ता. पांढरकवडा, जि. यवतमाळ) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी वडील विलास मरापे, भाऊ हिरामण मरापे आणि मरापे यांचा जावई सुभाष (पूर्ण नाव समजू शकले नाही) तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रेखा हिचा विवाह काही दिवसांपूर्वी राम शेडमाके याच्याबरोबर झाला होता. कुटुंबीयांचा विरोध पत्कारून रेखाने रामबरोबर लग्न केले होते. त्यानंतर काही दिवसांनी रेखा माहेरी म्हणजे पेंढरी येथे आली होती. पण 11 एप्रिल रोजी अचानक रेखाचा मृतदेह एका विहिरीत आढळला होता. सुरुवातीला आत्महत्या वाटणारा हा प्रकार ऑनर किलींगचा असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले. मनाविरोधात लग्न केल्याने रेखाचे कुटुंबीय नाराज होते. ती माहेरी आली असता 9 एप्रिल रोजी रेखाचे वडील विलास मरापे, रेखाचा भाऊ हिरामण मरापे आणि मरापे यांचा जावई सुभाष यांनी रेखाला पकडून शेतशिवारात आणले. त्याठिकाणी तिघांनी दोरीनं गळा आवळून तिची हत्या केली. तसेच एक चिठ्ठी लिहून तिच्या हाताला बांधली आणि तिचा मृतदेह विहिरीत ढकलून दिला. हत्येनंतर कुटुंबीयांनी दोन दिवस काही घडले नसल्याचे दाखवले. पण पोलिसांनी अत्यंत शिताफीने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आहे.