‘आयुष’ डॉक्टर नेमल्यास रुग्णालयाची मान्यता होणार रद्द; ‘एनएबीएच’ने दिलाय इशारा, आरोग्य सेवा विस्कळीत होणार

पोलीसनामा ऑनलाईन टीम : ‘नॅशनल अ‍ॅक्रे डिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अ‍ॅण्ड हेल्थके अर’ने (एनएबीएच) दिलेेल्या नोटिसांमुळे आरोग्य सेवा विस्कळीत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याचं कारणंही तसंच आहे. अतिदक्षता विभागातील रुग्णसेवेसाठी अ‍ॅलोपॅथीची पदवी असलेल्या निवासी डॉक्टरांऐवजी आयुष डॉक्टरांच्या नेमणुका करणार्‍या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येतील, असा इशारा रुग्णालयांना मान्यता देणार्‍या ‘नॅशनल अ‍ॅक्रे डिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अ‍ॅण्ड हेल्थके अर’ने (एनएबीएच) दिलाय. याचा परिणाम आरोग्य सेवेवर होणार असल्याचे समजत आहे.

अ‍ॅलोपॅथी उपचार देणार्‍या रुग्णालयांच्या अतिदक्षता विभागांत आयुष डॉक्टरांच्या नेमणुका केल्या जात आहे, असे निदर्शनास आले आहे. ही कृती नियम व अटींचे उल्लंघन करणारी आहे. त्याचा संबंध थेट रुग्णहित व त्यांच्या आरोग्याशी आहे. त्यामुळे अशा नेमणुका करणार्‍या रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याच्या नोटिसा ‘एनएबीएच’ने काढल्यात. ‘एनएबीएच’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अतुल कोचर यांनी या नोटिसा पाठवल्या आहेत.

आयुष डॉक्टरांच्या सक्षमीकरण समितीचे डॉ. मंदार रानडे म्हणाले, आयुर्वेदिक डॉक्टरांना मिळालेल्या शस्त्रक्रिया परवानगीमुळे अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्या संघटना अशा कृत्यांमधून आपली नाराजी व्यक्त करीत आहेत, हे स्पष्ट होत आहे. मात्र, आयुष डॉक्टर असलेल्या रुग्णालयांचे परवाने रद्द करण्याचे धोरण असेल तर राज्यासह देशभरातील रुग्णसेवा कोलमडेल याचे भान ठेवणं महत्त्वाचे आहे.

मग, हा दुजाभाव का?
परदेशामध्ये परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन डॉक्टरांच्या बरोबरीने रुग्णसेवेत सामावून घेण्याचे प्रयत्न आणि प्रयोग होतात. मात्र, भारतामध्ये अ‍ॅलोपॅथी डॉक्टरांच्या समकक्ष असलेला साडेपाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या आयुष डॉक्टरांबाबत असा दुजाभाव का?, असा प्रश्न आयुष डॉक्टर उपस्थित करताहेत.

‘एनएबीएच’चा दावा काय?
रुग्णालयांना रुग्णसेवेची राष्ट्रीय मान्यता देणार्‍या ‘एनएबीएच’ने अतिदक्षता विभागात आयुष डॉक्टरांच्या नेमणुकीला मान्यता नसल्याचा दावा केलाय. आयुष डॉक्टर अतिदक्षता विभागात कार्यरत असल्यास ते रुग्णहिताचे नाही, त्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रातील डॉक्टरांऐवजी आयुष डॉक्टरांची नियुक्ती अतिदक्षता विभागात केल्यास रुग्णालयांची मान्यता रद्द करण्यात येईल, असा इशारा दिलाय.

जाणून घ्या, डॉक्टरांचे वास्तव काय?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार 400 रुग्णांमागे एक डॉक्टर असणे अपेक्षित आहे. केवळ एमबीबीएस डॉक्टरांचा विचार केला तर, भारतामध्ये हे प्रमाण 1700 रुग्णांमागे एक डॉक्टर असे आहे. आयुष डॉक्टर व अ‍ॅलोपॅथी डॉक्टर यांचा एकत्रित विचार केला तर, हे प्रमाण 700 रुग्णांमागे एक डॉक्टपर्यंत येते, असे आयुष डॉक्टर सक्षमीकरण समितीचे डॉ. मंदार रानडे यांनी सांगितले आहे.