प्रदूषणामुळं लहान मुलांमध्ये फुफ्फुसाच्या आजारांचे प्रमाण वाढले, ‘ही’ काळजी घ्या

पोलिसनामा ऑनलाईन – पूर्वी अगदीच नगण्य असणारं हवा प्रदूषण ( air pollution) या आधुनिकतेच्या वेगासह झपाट्याने वाढत आहे. वाहन, औद्योगिक क्षेत्र, वाढती लोकसंख्या हे आणि असे अनेक घटक या वाढत्या प्रदूषणाला कारणीभूत आहेत.हवा प्रदूषण हा सध्या जगातील तज्ञांच्या मते अत्यंत चिंतेचा विषय बनत चालला असून हवा प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम लहान मुलांवर होतो आहे आणि लहान मुलांमध्ये फुफ्फुसाचे आजार (Lung disease)मोठ्या प्रमाणावर वाढत चालले आहेत. सध्या प्रदुषणाची पातळी हि जीवघेणी आहे विचार करा जाऊन काही वर्षांनी इतर पिढ्यांना या स्थितीशी कसा सामना करावा लागेल. आज आपण जाणून घेऊया की प्रदूषित हवेत श्वास घेतल्याने लहान मुलांच्या फुफ्फुसांवर काय परिणाम होतो आणि त्यावर काही उपाय आहेत का?

काय सांगते आकडेवारी ?
हवा प्रदूषणाचा लहान मुलांवर सर्वाधिक परिणाम होत आहे . नुकताच जन्म झाला असल्याने त्यांची शारीरिक स्थिती अत्यंत नाजूक असते. बाळ १-२ वर्षाचे होईपर्यंत सुद्धा त्याला अशा प्रदूषणाचा धोका असतो. एका संशोधनात हे दिसून आले की गेल्या वर्षी हवा प्रदूषणाला बळी पडून १.६ लाख बालकांचा मृत्यू झाला होता. याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार १५ वर्षांपेक्षा कमी वयाची ९५ टक्के मुले या प्रदुषणाच्या विळख्यात दिवसागणिक अडकत चालली आहेत.

गर्भातील बाळावर होणारा परिणाम
हार्वर्डच्या एका संशोधनानुसार गरोदरपणाच्या तिसऱ्या तिमाहीतमध्ये अधिक दुषित वायूमध्ये श्वास घेतल्याने बाळाला ऑटिज्‍म होण्याचा धोका अधिक बळावतो. गरोदरपणात अस्थमामुळे उच्च रक्तदाबाची समस्या देखील निर्माण होऊ शकते आणि किडनीची कार्यक्षमता मंदावते. जर वेळेवर उपचार केले नाही तर अस्थमामुळे बाळाला ऑक्सिजनची कमतरता भासू शकते आणि यामुळेच वेळेआधीच डिलिव्हरी होण्याचा धोका उद्भवतो. याशिवाय दुषित वायूचा अजून एक मोठा धोका म्हणजे मिसकॅरेज होय. अर्थात बाळ गर्भातच जन्माआधी मृत होऊ शकतं.

लहान मुलांच्या फुफ्फुसांवर होणारा परिणाम
मोठ्या व्यक्तींपेक्षा लहान मुलांच्या फुफ्फुसांवर वायू प्रदूषणाचा दुष्परिणाम वेगाने जाणवू लागतो. बाळाचा श्वसनमार्ग लहान आणि विकसित होत असतो. यामुळे ते प्रौढांच्या तुलनेमध्ये अधिक वेगाने श्वास घेतात. जेव्हा बाळाच्या शरीराचा विकास होत असतो तेव्हा विषारी आणि दुषित हवेमुळे त्याच्या फुफ्फुसांचा योग्य पद्धतीने विकास होत नाही. यामुळे मोठा झाल्यावर त्या मुलाला अस्थमा सारखा आजारही होऊ शकतो. जर जन्मापासूनच अस्थमा असेल तर मात्र ही स्थिती अजून बिघडू शकते. फुफ्फुसाच्या सामान्य विकारांपासून ते फुफ्फुसाचा कर्करोग वा न्युमोनिया सारखा जीवघेणा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कशा प्रकारे बचाव करता येऊ शकतो?
ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे अशा व्यक्ती जास्त करून या प्रदूषणाला बळी पडतात आणि या व्यक्तींमध्ये लहान मुले व वृद्धांचा समावेश होतो. म्हणून लहान मुलांना घेऊन सहसा घराबाहेर जाणे टाळावे. जर जायचे झाले तर कोरोना असो वा नसो बाळाला अवश्य मास्क घालावा. मास्क मुळे बऱ्यापैकी दूषित हवा रोखली जाईल. बाजारात लहान मुलांसाठी विशेष मास्क उपलब्ध असतात, त्यांचा वापर करणे उत्तम! घर प्रदूषित वातावरणात असेल तर बाहेरून कोणतीही हवा आत येणार नाही याची काळजी घ्यावी. दारे आणि खिडक्या बंद ठेवाव्यात. घरात जास्त व्हेंटिलेशन राहील याची सोया इंटेरियर डिजाईनर मार्फत करून घ्यावी.