आता Voter id झालं डिजिटल, जाणून घ्या मोबाईलमध्ये कसं करायचं Download

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  –  आधार कार्ड, पॅन कार्ड आणि ड्रायविंग लायसन्स अगोदरच डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाली आहेत. त्यानंतर आता मतदान ओळखपत्रसुध्दा (वोटर कार्ड) डिजिटल स्वरुपात उपलब्ध झाले असून ते आता आपल्याला मोबाइल फोन किंवा कम्प्यूटरवर डाउनलोड करता येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.25 जानेवारी) राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधत मतदारांना हे गिफ्ट दिले आहे.

निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ई-इलेक्ट्रिक फोटोचे आता डिजिटल लॉकर सारख्या माध्यमाप्रमाणे सुरक्षित ठेवले जाऊ शकते. तसेच याला पोर्टेबल डॉक्यूमेंट फॉर्मेटमध्ये मुद्रित करता येणार आहे. मतदान ओळखपत्र मोबाइलमध्ये डाउनलोड करण्याची ही सुविधा दोन टप्प्यात दिली जाईल. पहिल्या टप्प्यात म्हणजेच 25 जानेवारी ते 31 जानेवारी दरम्यान केवळ नवमतदारांना डिजिटल वोटर कार्ड डाउनलोड करता येईल. परंतु, यासाठी त्यांचा मोबाइल नंबर निवडणूक आयोगासोबत नोंदणीकृत असायला हवा. दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच 1 फेब्रुवारी पासून सर्व वोटर्स आपल्या वोटर आयडी कार्डला डिजिटल रुपात डाउनलोड करू शकतील. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन हे काम करता येऊ शकते.

पीडीएफ स्वरुपात मिळणार डिजीटल कार्ड

मतदान ओळखपत्र डिजिटल कॉपीला डाउनलोड करण्यासाठी तुम्ही दोन पद्धतीचा वापर करू शकतात. पहिला म्हणजे मोबाइल अ‍ॅप आणि दुसरा म्हणजे निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून करता येणार आहे. जर तुमच्या फोनमध्ये अ‍ॅप नसेल तर तो अ‍ॅप डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे. आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमचा मोबाइल नंबर ई-मेल आयडीवरून लॉग इन करावे लागेल. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला Download e-EPIC हा पर्याय दिसेल. त्यानंतर मोबाइल नंबर किंवा वोटर कार्ड नंबर टाकून तुम्ही पीडीएफमध्ये आपले मतदान ओळखपत्र डाउनलोड करू शकता. पीडीएफ फाइलमध्ये एक क्यूआर कोड दिसेल. त्याला स्कॅन केल्यानंतर पूर्ण डिटेल्स तुम्हाला दिसणार आहे.