‘कारमध्ये पतीला मी KISS करेन, हिंमत असेल तर अडवून दाखवा?’, विनामास्क फिरणाऱ्या दाम्पत्याची पोलिसांसोबत हुज्जत (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना प्रादुर्भाव वाढत असल्याने अनेक राज्यांमध्ये कडक निर्बंध केले आहेत. मास्क घालणं आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळणे गरजेचे आहे. पण काही नागरिक अद्याप या नियमांचे पालन करताना दिसत नसल्याने पोलिस आदेशानुसार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत आहेत. याच निर्बंधावरुन एका दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घालत त्यांच्याविरोधात आर्वाच्च भाषा वापरली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या दाम्पत्यावर पोलिसांनी कोविडचे नियम पालन न केल्याबद्दल आणि शनिवार व रविवार विकेंड लॉकडाऊनचे नियम मोडल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या जोडप्याला अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये अभा यादव आणि तिचा नवरा पंकज दत्ता पोलिस कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन करीत आहे. पोलिसांनी सांगितले की, या जोडप्याने कर्फ्यू पास देखील घेतला नव्हता. जेव्हा पोलिसांनी त्यांना थांबवले तेव्हा महिलेने गाडीची काच खाली केली आणि म्हणाली, मी माझ्या पतीला किस करीन, तू मला थांबवशील का ? ही घटना दिल्लीगेट दरियागंज या भागातील आहे. हे जोडपं दिल्लीच्या पटेल नगरमध्ये राहते. या आरोपी जोडप्याविरोधात दरियागंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. तिचा नवरा देखील ओरडत म्हणाला, तुम्ही माझी गाडी कशी रोखली, मी माझ्या पत्नीसह कारमध्ये आहे. दिल्ली पोलिसांनी त्यांना मास्क न घातल्याने रोखले होते. त्यामुळे हा पूर्ण प्रकार घडला. पोलिस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कारमधील एक जोडपे वीकएंडचा कर्फ्यू असूनही मास्क न लावता गाडीतून जात होते, जेव्हा पोलिसांनी त्यांची कार थांबवली तेव्हा त्यांनी पोलिसांनाच फैलावर घेण्यास सुरवात केली. तसेच या महिलेने आपण लोकसेवा परीक्षा पास केल्याचा दावा केला आहे. जोडप्याने मास्क घातला नव्हता ना त्यांच्याकडे कोणताही परवाना नव्हता. पोलिसांनी गाडी थांबवली तेव्हा पोलीस निरीक्षक व एसआय दर्जाचे अधिकारी तैनात होते. त्यांच्याशी त्यांनी गैरवर्तन केले.

व्हायरल झालेला व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत IAS अधिकारी अवनीश शरण यांनी कॅप्शनमध्ये लिहले आहे की, यूपीएससी मेन्स क्लिअर केलेली मॅडम आहे. कर्तव्यावर तैनात पोलिसांना असभ्य वर्तणुकीची काय शिक्षा होते, कृपया यांना कायद्याने समजून सांगा. हा व्हिडीओ 19 एप्रिल रोजी सकाळी शेअर केला असून आतापर्यंत याला 10 लाखाहून अधिक जणांनी पाहिला आहे. तसेच अनेकांना प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

दरम्यान, पोलिसांनी अटक केलेल्या अभा यादव या महिलेने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, मास्क घातल्यानंतर मला गुदरमरल्यासारखे होते आणि श्वास घेण्यास त्रास होतो. तसे बघायला गेले तर मी माझ्या पतीसोबत कारमध्ये होते. त्यामुळे मला मास्क घालण्याची आवश्यकता वाटली नाही. मला असे वाटते की सर्वजनिक ठिकाणी मास्क घालणे आवश्यक आहे.