कोल्हापूर : 87 वर्षीय पत्नीच्या निधनानंतर अवघ्या तासाभरात 95 वर्षीय पतीनं सोडले प्राण

कोल्हापूरः पोलीसनामा ऑनलाइन – जन्मानंतर मृत्यू अटळ असते. पण काही मृत्यू हे अनेकांना जिव्हारी लावून जातात. असाच एक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे घडला आहे. सुमारे 69 वर्षे संसारात साथ देणाऱ्या सहचारिणीचा मृत्यु झाल्याचे दु:ख सहन न झाल्याने पतीने अवघ्या तासाभरात प्राण सोडले. दोघांनी मिळून परलोकाचा प्रवास एकत्रच केला. नवरा-बायकोचे हे अनोखे प्रेम पाहून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तानूबाई मडिलगे (वय 87) आणि दत्तू मडलिगे (वय 95) असे मृत्यू झालेल्या पती-पत्नीची नावे आहेत.

मिळालेल्या माहितनुसार दत्तू मडलिगे यांना डोळ्याने दिसत नसल्याने पत्नी तानूबाई आणि सुनेच्या आधारावर त्यांचा दिनक्रम सुरू होता. पंधरा दिवसांपूर्वी भावजयीचा मृत्यू झाल्याने त्याचा धसका तानूबाईने घेतला होता. त्यामुळे त्यांना रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. मुंबईहून आलेल्या मुलाने तानूबाईंना उपचारासाठी कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले. पत्नीला रुग्णालयात दाखल केल्याचे समजताच दत्तू यांनी अन्नपाणी सोडले. उपचार सुरु असताना शनिवारी तानूबाईंचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे दुःख सहन न झाल्याने दत्तू यांनी तासाभरातच प्राण सोडले. त्यांच्या 69 वर्षांच्या सहजीवनाचा शेवट झाला.