Pune : अजून मी मेली नाय ! अंत्यसंस्काराची तयारी सुरु असतानाच आजीने उघडले डोळे, पुणे जिल्ह्यातील घटना

बारामती : ऑनलाइन टीम – राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. रुग्ण वाढत असल्याने आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने काही जणांना आपला जीव गमवावा लागत आहे. याच दरम्यान मृतदेह आदलाबदली होण्याचे प्रकार घडले आहेत. तर काही ठिकाणी जीवंत व्यक्तीला मृत घोषीत करण्याचे प्रकार समोर आले आहेत. मंगळवारी (दि.11) बीकानेर येथे एका 70 वर्षीय आजीला डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर दीड तासांनी ती महिला जीवंत अल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. ही घटना ताजी असतानाच अशा प्रकारची घटना पुणे जिल्ह्यात घडली आहे.

एका वृत्तपत्राच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, बारामती तालुक्यातील मुढाळे गावातील 76 वर्षीय आजीला काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यामुळे आजीला घरातच विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्याच ठिकाणी तिच्यावर उपचार केले जात होते. वय जास्त असल्याने आजीच्या प्रकृतीत सुधारणा होण्यास अनेक अडचणी येत होत्या. आजी उपचारांना साथ देत नसल्याने कुटुंबातील व्यक्तींची चिंता दिवसेंदिवस वाढत होती. परंतु घरातील मायेचा आधार असलेली आजी जगली पाहिजे म्हणून कुटुंबातील लोक कोरोना नियमांचे पालन करुन तिची सेवा करत होते.

आजीवर उपचार सुरु होते मात्र ती उपचारांना प्रतिसाद देत नव्हती. काही दिवसांपासून तिची प्रकृती खालावत चालली होती. त्यामुळे पुढील उपचारासाठी तिला बारामती येथील रुग्णालयात घेऊन जाण्याचा निर्णय कुटुंबाने घेतला. आजीला बारामती येथील रुग्णालयात घेऊन जात असतानाच तिची हालचाल बंद झाली. बराच प्रयत्न करुन देखील तिच्या शरीराची हालचाल होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे आजी आपल्याला सोडून गेली असे कुटुंबाला वाटले. त्यामुळे त्यांनी अर्ध्या रस्त्यातून गाडी माघारी वळवून घर गाठले.

घरी आल्यानंतर कुटुंबाने नातेवाईकांना आजीच्या निधनाची वार्ता कळवली. नातेवाईक आले आणि त्यांनी आजीच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. नातेवाईकांनी हंबरडा फोडणे सुरु केले. हे ऐकून आजीबाईंनी डोळे उघडल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. आजीने डोळे उघडल्यानंतर काही पाहुण्यांना फोन करुन आजी अजून आहे, असा उलट निरोप देण्यात आला. आजीने डोळे उघडल्याने नातेवाईकांच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रूंचं रुपांतर आनंदाश्रूत झाले.

आजीला कोरोना झाल्यामुळे तिच्या जवळ नातेवाईकांना जाता येत नव्हते. कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला तर रुग्णालय प्रशासन देखील मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देत नाही. अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. या घटनेतही त्याचा प्रत्यय आला. कुटंबाने अंत्यसंस्काराची घाई केली असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा सध्या गावात सुरु आहे.