“राजकीय पक्ष त्यांच्या बैठकांपूर्वी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत?”

आंध्रप्रदेश : वृत्तसंस्था – दाक्षिणात्य अभिनेता आणि जन सेना पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी चित्रपटगृहातील चित्रपट सुरु होण्याआधी वाजवण्यात येणाऱ्या राष्ट्रगीतासंदर्भात एक वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य करून त्यांनी एक नवा वाद ओढावून घेतला आहे. आंध्रप्रदेशमधील कुरनूल जिल्ह्यातील एका कार्यक्रमात ते तरूणांना संबोधित करत होते. त्यावेळी चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उठून उभे रहावेसे वाटत नाही, असं वक्तव्य पवन कल्याण यांनी केलं.

चित्रपटगृहात राष्ट्रगीत वाजवले जाते तेव्हा मला उभे रहायला आवडत नाही. कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळींबरोबर निवांत चित्रपट पाहण्याच्या उद्देशाने चित्रपटगृहात गेल्यानंतर आधी प्रत्येकाला आपण देशभक्त असल्याचे दाखवावे लागते, हे चुकीचे आहे, असं पवन कल्याण यांनी सांगितलं.

राजकीय पक्ष त्यांच्या बैठकी सुरु करण्याआधी राष्ट्रगीत का वाजवत नाहीत ? केवळ चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवण्याचे बंधन का ?, देशातील सर्वोच्च (सरकारी) कार्यालयांमध्येही राष्ट्रगीत वाजवले जावे. जे लोक आपल्यासाठी नियम आणि कायदे तयार करतात त्यांनीच ते अमलात आणून सामान्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा, असं पवन कल्याण यांनी म्हटलं. हे वक्तव्य करून त्यांनी राजकीय पक्षांना आणि नेत्यांना राष्ट्रगीतासंदर्भात प्रेम नाही का, असा प्रश्न पवन कल्याण यांनी उपस्थित केला.

दरम्यान, २०१६ साली सर्वोच्च न्यायलयाने दिलेल्या एका निर्णयामध्ये चित्रपटगृहात राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ सर्वांनी उभे राहणे अपेक्षित असल्याचे म्हटले होते. त्यावेळीही पवन कल्याण यांनी न्यायलयाच्या निर्णयाविरोधात नाराजी दर्शवली होती. तर २०१६ साली राष्ट्रगीताचा अपमान केल्याप्रकरणी हैदराबादमधील एका वकिलाने पवन कल्याण यांच्याविरुद्धात तक्रार देखील दाखल केली होती. आता याच मुद्द्यावरून ते पुन्हा वादात सापडण्याची शक्यता आहे.