हातात घड्याळ आहे, शरद पवार यांना कमळाचा बुके दिलाय : उदयनराजे

सातारा : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या तीन दिवसापासून माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार कोल्हापूर व सातारा दौऱ्यावर आहेत. महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार रविवारी कऱ्हाडमध्ये आले होते. कार्यक्रमस्थळी जाण्यापूर्वी एका हॉटेलमध्ये खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांच्याशी चर्चा केली. यावेळीही उदयनराजेंनी आगामी लोकसभा निवडणुकीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. यावेळी निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.
पवारांच्या भेटीनंतर पत्रकारांनी ‘महाराष्ट्र क्रांती पक्ष तुमचा फोटो वापरतो, मग आता लोकसभा निवडणूक घड्याळावर की कमळावर लढवणार?’ असा प्रश्न विचारला. त्यावर ‘महाराष्ट्र क्रांती पक्ष फोटो वापरत आहेत तर चांगलंच आहे की मग. माझा घसा बसलाय मी काय बोलू. माझ्या हातात घड्याळ आहे आणि शरद पवार यांना कमळाचा बुके दिलाय,’ असे उत्तर देत उदयनराजेंनी स्मितहास्य केले. त्यामुळे उदयनराजेंच्या उमेदवारीबद्दल अद्यापही निश्चितता झाली नसल्याचे दिसून येते. दरम्यान, ‘निवडणूक आली की राम मंदिर मुद्दा कसा निघतो, यावर तोडगा निघायला हवा. तसेच केवळ सवलती नको, सरळ ओबीसी आरक्षण द्या,’ या विषयांवरही त्यांनी आपले मत व्यक्त केलं.
महाराष्ट्र क्रांती पक्ष – 
सकल मराठा समाजाच्या वतीने समाजाच्या  “महाराष्ट्र क्रांती” या नव्या पक्षाची स्थापना दिवाळीतील पाडव्याच्या मुहूर्तावर कार्यकर्ते सुरेश पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आली. मराठा समाजाच्या विकासासाठी आता ”महाराष्ट्र क्रांती” सेना पक्षाच्या वतीने लोकसभा विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्याची घोषणा कोल्हापुरात करण्यात आली.
विशेष म्हणजे खासदार उदयनराजे यांनी जर राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवली नाही तर त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेकडून निवडणूक लढवावी असे खुले आमंत्रण देखील महाराष्ट्र क्रांती सेनेच्या वतीने देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा समाजाचे  दैवत आहेत आणि त्यांचे थेट वंशज म्हणजे साताऱ्याचे खासदार उदयन राजे आहेत. त्यामुळे त्यांनी जर राष्ट्रवादी पक्षातून निवडणूक लढवली नाही तर त्यांनी महाराष्ट्र क्रांती सेनेकडून निवडणूक लढवावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.
राजू शेट्टींनी घेतली शरद पवारांची भेट, नव्या समीकरणांची नांदी ?

दरम्यान शरद पवार यांची गुरुवारी कोल्हापूर येथे स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी भेट घेतली. भिन्न विचारसरणीचे दोन नेते भेटल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अशात राजू शेट्टी यांनी त्यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शेट्टी यांनी पवारांची भेट घेवून तब्बल पाऊण तास बंद खोलीमध्ये विविध विषयांवर चर्चा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ‘संकेत मिलनाचा ‘ वैशिष्टयपूर्ण मानला जात आहे. ही नव्या राजकीय समीकरणांची नांदी असल्याचे दोघांतील देहबोलीवरून दिसून आले.

व्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा ?? –  हातात घड्याळ आहे, शरद पवार यांना कमळचा बुके दिलाय : उदयनराजे