शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात आ. पडळकरांचा हल्लाबोल, म्हणाले – ‘आमच्या जिल्ह्यात सामना येत नाही अन् तो मी वाचत नाही’

सिंधुदुर्ग: पोलीसनामा ऑनलाईन – सामना वृत्तपत्राची फार दखल घेण्याचे कारण नाही. मी कधीही सामना दैनिक वाचले नाही. किंबहुना हा पेपर आमच्या जिल्ह्यात येतही नाही अन् तो कोणी वाचतही नाही, अशी उपरोधिक टीका करत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

आमदार पडळकर सोमवारी (दि. 22) सोमवारी सिंधुदुर्गमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. पेट्रोल अन् डिझेलच्या वाढत्या दरवाढीवरून सामनाच्या अग्रलेखातून सोमवारी मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. राममंदिरासाठी चंदा वसुली करण्यापेक्षा पेट्रोल-डिझेलचे भाव चंद्राला भिडत आहेत, ते खाली आणा. त्यामुळे रामभक्तांच्या चुली पेटतील व श्रीरामही खूश होतील, असा टोला मोदी सरकारला लगावला होता. यावर पडळकर याना विचारले असता ते म्हणाले की, सामना दैनिकाची फार दखल घेण्याचे कारण नाही. सामना पेपर कोणी वाचत नाही. तुम्ही टीव्हीवर सामना दाखवता म्हणून सामना दैनिक अस्तित्वात आहे हे लोकांना कळते. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोकणात सामना किती येतो? असा सवाल आमदार पडळकर यांनी उपस्थित केला.