राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजी पालिकेला लागले महापालिका होण्याचे वेध

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या वेळी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा असे सांगितले होते. तसेच राज्याचे मँचेस्टर अशी शहराची ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील दुसऱ्या क्रमांकाचे असलेले शहर इचलकरंजी नगरपालिकेचेही महापालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव द्यावा असेही तेव्हा एकनाथ शिंदे म्हटले होते. यावरून आता तेथील महापालिकेचे स्वप्न पाहण्यास तेथील मंडळींना वेध लागले आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्यानंतर शहराच्या विकासाचा नेमका कोणता विकास होणार आहे याचा कसलाही विचार केलेला नाही. तसेच याचा कसलाही प्रस्ताव नाही. फक्त महापालिका या मोठय़ा नावाचे आकर्षण असून, ते व्हावे असे चित्र उमटताना दिसत आहे. इचलकरंजी हे यंत्रमागाचे शहर आहे. यंत्रमाग उद्योग येथे अधिक प्रमाणात गल्लोगल्ली पाहायला मिळतो. इचलकरंजी शहराचा गेल्या ३०-४० वर्षांत मोठा विकास झाला आहे. आजूबाजूच्या खेडेगावापर्यंत इचलकरंजी शहर विस्तारले गेले आहे. याच काळात मोठय़ा वास्तू, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, प्रशस्त क्रीडांगण, शाळांच्या आकर्षक इमारती असे बरेच काही भव्यदिव्य येथे घडून गेले.

इचलकरंजी नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडलेली नाही. या कारणाने नगरपालिकेची आर्थिक कोंडी होताना दिसते. तर इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून कोणतीही वास्तू उभी राहिली नाही. जकातीचे अनुदान बंद झाल्यापासून राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानावरच नगरपालिकेची आर्थिकेत्तर अवलंबून आहे. गरीब- श्रमिकांचे शहर असा मुद्दा करीत दरवेळी घरफाळा, पाणीपट्टी वाढ हाणून पाडली जाते. त्यामुळे आता इचलकरंजी नगरपालिकेला आता महानगरपालिका होण्याची स्वप्ने पडली आहेत. तसेच नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी महापालिकेचा प्रस्ताव देण्याचे सूचित केल्याने या स्वप्नाला नवी दिशा मिळत चालली आहे.