कोरोनाच्या दुसर्‍या लाटेबाबत ICMR चा मोठा खुलासा, म्हणाले – ‘ही लोकं कारणीभूत’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संक्रमणामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट पसरण्यामागे असलेल्या कारणाचा खुलासा आयसीएमआरने केला आहे. कोणत्याही रोगाचं संक्रमण कसे पसरते याचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे. जर प्रसाराचं कारण समजलं तर त्याला पायबंद घातला जाऊ शकतो आणि आजारावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. त्यामुळे मेडिकल क्षेत्रात अशा प्रकारचे अनेक सर्वे केले जातात आणि त्याचा अहवाल सार्वजनिक केला जातो. असाच आयसीएमआरचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. एका वृत्तपत्राने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

‘हे’ लोक कारणीभूत

ICMR च्या अहवालानुसार, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या टप्प्यात पसरलेल्या संक्रमणाला प्रवासी मजूर आणि धार्मिक कार्यक्रमांतील गर्दी कारणीभूत होती. दुसऱ्या लाटेच्या सुरुवातीच्या काळात घेतलेल्या सॅम्पल्समध्ये SARS-CoV-2 विषाणूच्या व्हेरियंट मध्ये स्वतंत्र अमिनो अ‍ॅसिड म्युटेशन सापडली होती. आताच्या विषाणूच्या परिस्थितीला हे म्युटेशनच कारणीभूत ठरल्याचे आता दिसून येत आहे, असे अहवालात म्हटल्याचे वृत्तपत्राने म्हटले आहे.

कोरोनाचे तीन व्हेरियंट सापडले

भारतामध्ये B.1.1.7 लिनिएज, व्हेरियंट ऑफ कन्सर्न आणि B.1351 लिनिएज हे कोरोना विषाणूचे तीन व्हेरियंट सापडले आहेत. यामुळे अँटिजेनिक ड्रिफ्ट, संक्रमणाची क्षमता वाढ आणि इम्युन एक्सेप (विशेषत: B.1351) प्रक्रिया वाढली असल्याचे ICMR ने अहवालात म्हटले आहे. नुकतंच भारतीय SARS-CoV-2 सिक्वेन्स मध्ये नवं लीनिएज (B.1351) सापडलं असून त्यातील स्पाईक प्रोटीन मध्ये E484Q व L452R सापडली आहेत. यांना साधारणपणे डबल म्युटंट म्हटले जाते. ते अधिक संक्रमित असल्याचे मानले जाते, असेही अहवालात म्हटले आहे.

घरीच रॅपिड अँटिजेन टेस्ट करावी

ICMR ने गुरुवारी (दि.20) असेही सांगितले की, कोरोनाबाधिताच्या संपर्कात असलेल्या व्यक्तीला जर कोरोनाची लक्षणं दिसली असतील तर तो घरच्या घरी रॅपिड अँटिजेन टेस्ट करु शकतात. आयसीएमआरने घरी टेस्ट करण्यासंबधी स्वतंत्र अ‍ॅडव्हायजरी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये सांगितले की, टेस्टिंग किट तयार करणाऱ्या मॅन्युफॅक्चररने दिलेल्या पद्धतीनुसारच घरी टेस्टिंग करावे.