जर ‘फैसल’चे नाव विवेक तिवारी असते तर UP सरकारने माफी मागितली असती… उन्नाव घटनेवर ओवैसींचा योगींवर वार

हैद्राबाद : ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शनिवारी उन्नावच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, योगी सरकारने राज्यात मुस्लिमांच्या विरोधात द्वेष पसरवला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी लॉकडाऊन दरम्यान भाजी विकत असल्याने बेदम मारहाण केल्याने एका भाजी विके्रत्याचा मृत्यू झाला.

न्यूज एजन्सी एएनआयशी बोलताना ओवैसी म्हणाले, जर मुलाचे नाव फैसल नसते आणि तो विवेक तिवारी सारख्या हिंदू नावाचा हिंदू असता, तर योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने त्याच्या कुटुंबाची माफी मागितली असती आणि मृताच्या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाईची रक्कम दिली असती. त्यांनी म्हटले की, अशा घटनांवरून समजते की, उत्तर प्रदेश सरकारने राज्यात राहणार्‍या मुस्लिमांच्या विरूद्ध द्वेष पसरवला आहे.

त्यांनी म्हटले की, पुराव्यावरून समजते की, उत्तर प्रदेशच्या जवळपास 56 टक्के पोलिसांचे म्हणणे आहे की, योग्य तपास होण्यापूर्वीच मुस्लिम गुन्हेगार असतात. मुस्लिमांसाठी असलेला हा द्वेष राज्याच्या मुस्लिम तरूणांच्या बाबतीत युपी पोलिसांमध्ये सतत दिसून येतो. आम्ही या कृत्याचा निषेध करतो आणि हा योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशातील भाजपा सरकारवरील आणखी एक काळा डाग आहे.