कायदा करून मराठा आरक्षण द्या, अन्यथा तलवार मोर्चा : छावा संघटनेचा इशारा

ADV
लातूर : पोलीसनामा आॅनलाइन – आंदोलन काय करताय… एक डिसेंबरला जल्लोष करा, असे मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल न पाहताच म्हटले होते. पण, जोपर्यंत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षणाचा कायदा होत नाही, तोपर्यंत ही केवळ फसवेगिरी आहे. अधिवेशनात कायदा करून मराठा समाजाला आरक्षण द्या, अन्यथा या पुढे मूक व ठोक मोर्चे नव्हे, तर तलवार मोर्चे निघतील, असा इशारा छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष तथा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक नानासाहेब जावळे पाटील यांनी औसा येथे दिला.
जावळे पाटील म्हणाले, आजवरच्या सरकारने मराठा समाजाला मुर्खात काढण्याचे काम केले आहे. केवळ मतांपुरता वापर करून त्यांनी आरक्षणाचे गाजर दाखविले. परंतु आरक्षण दिले नाही. मराठवाड्यासह महाराष्ट्रात भीषण दुष्काळी परिस्थिती असताना फडणवीस सरकार दिल्लीवरून टीम आणून रात्रीची पाहणी करून घेते आणि ज्यांना शेतीचे काहीच कळत नाही, अशा लोकांकडून अहवाल मागविते व दुष्काळ जाहीर करण्यासाठी चालढकल करते तेच फडणवीस सरकार एक डिसेंबरला मराठा समाजाने जल्लोष करावा, अशी भाषा बोलते. आम्ही आता त्यांच्या या फसव्या बोलण्याला भुलणार नाही. २० तारखेपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण सुरू होणार असून ज्यांना शक्य आहे त्यांनी मुंबईला यावे. ज्यांना शक्य नाही त्यांनी आपापल्या भागातील लोकप्रतिनिधींना घेराव घालून आंदोलन करावे, असे आवाहन समाजबांधवांना जावळे पाटील यांनी केले.

तर विजयकुमार घाडगे पाटील म्हणाले, मराठा समाजाला स्वतंत्र ओबीसी कोट्यातून आरक्षण दिले पाहिजे आणि तेही पूर्ण सोळा टक्के मिळाले पाहिजे. सर्वच जाती धर्मांना या सरकारने झुलवायचे काम केले आहे. आता मूक मोर्चा नाही तर या सरकारच्या विरोधात तलवार मोर्चा काढावा लागला तरी आम्ही मागे पुढे पाहणार नाही. या सभेला गोपाळ धानुरे, भगवान माकणे, भीमराव मराठे, महेश डोंगरे आदींची भाषणे झाली. यावेळी राजेंद्र गिर महाराज, भगवान माकणे, मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे, भीमराव मराठे, महेश डोंगरे, सुरेश भुरे, विनोद माने, गोपाळ धानुरे यांच्यासह तालुक्यातील हजारो मराठा बांधव उपस्थित होते.

अहमदनगर महापालिका निवडणुक : ६८ जागांसाठी ७१५ अर्ज