ऑनलाईन पेमेंटसाठी Google Pay, Phone Pay वापरणार्‍यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्र सरकारकडूनही डिजिटल पेमेंटसाठी प्रोत्साहन दिले जात आहे. भारतीयांचा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस UPI द्वारे व्यवहार करण्याकडे कल वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांना पेमेंट्ससाठी ऑनलाईन पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन केले होते. पेटीएम, गुगल पे, फोन पे यासारख्या डिजिटल पेमेंट माध्यमांचा वापर लोकांकडून वाढला आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने ऑनलाइन पेमेंटसाठी UPI चा वापर करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची सूचना जारी केली आहे. NPCI ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील काही दिवस यूपीआय पेमेंटमध्ये समस्या जाणवणार आहे. रात्री १ ते ३ च्या दरम्यान यूपीआयची सेवा खंडीत राहू शकते. किती दिवस ही समस्या जाणवेल याची माहिती देण्यात आलेली नाही. पण, पुढील काही दिवस लोकांना ही समस्या जाणवत राहणार आहे. त्यामुळे पेमेंट्ससाठी डिजिटल माध्यमांचा (पेटीएम, गुगल पे, फोन पे) वापर करणाऱ्या लोकांसाठी ही महत्त्वाची बातमी असून ग्राहकांना यूपीआय व्यवहाराचं नियोजन करावं लागणार आहे.

रात्री १ ते ३ च्या दरम्यान सिस्टिम अपग्रेडचं काम केलं जाणार आहे. NPCI ने ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी नव्या वर्षापासून UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाणार असल्याचं वृत्त आलं होतं. पण, NPCI ने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. UPI व्यवहारांवर शुल्क आकारलं जाण्याच्या वृत्तामध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं म्हटलं होतं. चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नका असं आवाहन करताना NPCI ने UPI व्यवहारांवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नसल्याचं म्हटलं होतं.