प्रमुख पाहुण्यांशिवाय यंदा होणार प्रजासत्ताक दिन; 55 वर्षातील पहिली घटना, मोटारसायकल स्टंटही होणार नाहीत

नवी दिल्ली : कोविड १९ ची खबरदारी लक्षात घेत या वर्षी ७२ वा प्रजासत्ताक दिन (Republic Day)  अगदी साधेपणाने आणि कमी लोकांच्या उपस्थितीत साजरा केला जात आहे. गेल्या ५५ वर्षात प्रथम प्रमुख पाहुण्याविना हा प्रजासत्ताक दिन (Republic Day) साजरा होत आहे. या वर्षी प्रेक्षकांची संख्याही कमी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एकूण १ लाख २५ हजार प्रेक्षक ही परेड पाहण्यासाठी उपस्थित होते. मात्र, यंदा ही संख्या केवळ २५ हजारांवर आणण्यात आली आहे. यावर्षी सर्वसाधारण सार्वजनिक तिकीटाची किंमत ४ हजार ५०० रुपये इतकी सांगितली आहे. या वर्षी परेडचा कालावधीही कमी करण्यात आला आहे.

दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मित्र देशातील राष्ट्रप्रमुख यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले जाते. या वर्षी प्रमुख पाहुणे म्हणून इंग्लडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना बोलविण्यात आले होते. त्यांनी निमंत्रण स्वीकारलेही होते. मात्र, इंग्लडमध्ये कोविड १९ चा कहर वाढल्याने ते प्रमुख पाहुणे म्हणून परेडला उपस्थित राहू शकणार नाही. यापूर्वी १९५२, १९५३ आणि १९६६ यावर्षी कोणत्याही प्रमुख पाहुण्याशिवाय प्रजासत्ताक दिनाच्या परेडचा कार्यक्रम झाला होता. १९६६ नंतर यंदा प्रथम प्रमुख पाहुण्यांविना परेड होणार आहे. याशिवाय राजपथावर होणारे मोटारसायकल चालकांचे स्टंटही रद्द करण्यात आले आहे.