India China Faceoff : चीनसोबतचा तणावा वाढला, लष्करप्रमुख परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लडाखमध्ये

लडाख : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व लडाखमधील पॅंगॉंग सरोवर परिसरात चीनच्या कुरापती सुरूच आहेत. सरोवराच्या दक्षिण काठाजवळ २९ ते ३० ऑगस्टदरम्यान घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सोमवारी पुन्हा चिथावणीखोर लष्करी कारवाया केल्या असून, या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी लष्करप्रमुख मनोज नरवणे लडाखला पोहचले आहेत. ते दक्षिण पँगाँग आणि अन्य भागांतील परिस्थितीची पाहणी करणार आहेत.

चिनी सैनिक २९ ऑगस्टच्या मध्यरात्री पॅंगॉंग सरोवराच्या दक्षिण काठाकडे कूच करीत होते. त्यांचा हेतू लक्षात येताच भारतीय लष्कराने त्या भागात जवानांच्या तुकड्या तैनात केल्या. जवानांनी चीनच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे. दरम्यान, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर परिस्थितीचा आढावा घेण्याचं काम लष्करप्रमुख करणार आहेत. एका बाजूस लष्करप्रमुख लडाखला आले असताना दुसऱ्या बाजूला दिल्लीत बैठकांचे सत्र सुरु आहे.

मंगळवारी पार पडली उच्चस्तरीय बैठक

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी पूर्व लडाखमधील परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, संरक्षणदलप्रमुख जनरल बिपीन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणे, हवाईदल प्रमुख आरकेएस भदौरिया उपस्थित होते. प्रत्यक्ष ताबा रेषेजवळील संवेदनशील क्षेत्रात चीनच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी आक्रमक भूमिका कायम ठेवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

… पुन्हा चीनवर डिजिटल स्ट्राईक

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बुधवारी चिनी बनावटीच्या ११८ अ‍ॅपवर बंदी घातली आहे. त्यात लोकप्रिय असलेल्या ‘पब्जी’ अ‍ॅपचाही समावेश आहे. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने जूनमध्ये ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मतेला, देशाच्या सुरक्षेला धोका पोहचवण्याची क्षमता या अ‍ॅपमध्ये असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आल्याचं केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाने सांगितलं होत.