भारताने 21 दिवसात साध्य केले 50 लाख लसीकरणाचे लक्ष्य, अमेरिका आणि ब्रिटनला टाकले मागे

नवी दिल्ली : भारत कोरोना लसीकरणात वेगाने पुढे जात आहे. भारताने आतापर्यंत अवघ्या 21 दिवसात 50 लाख लसीकरणाचे लक्ष्य प्राप्त केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोहर अगनानी यांनी शुक्रवारी सांगितले की, भारताने 50 लाख लसीकरणाचा आकडा पार केला आहे. ते म्हणाले, भारताने 21 दिवसात 50 लाख लसीकरण केले, तर अमेरिकेत 50 लाख लसीकरणासाठी 24 दिवस, ब्रिटनमध्ये 43 दिवस आणि इस्त्रायलमध्ये 45 दिवस लागले होते.

सरकारने शुक्रवारी सांगितले की, देशभरात सुरू करण्यात आलेल्या कोविड-19 लसीकरण अभियानांतर्गत प्रारंभिक 15 दिवसात लसीकरण संबंधी प्रतिकुल प्रभावाची (एईएफआय) 7580 प्रकरणे (0.2 टक्के) नोंदली गेली आहेत. लोकसभामध्ये व्हिनसेंट एच पाला आणि सजदा अहमद यांच्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी म्हटले की, लसीकरणसंबंधी प्रतिकूल प्रभावाची (एईएफआय) एका पूर्णत: रचनाबद्ध आणि संतुलित देखरेख प्रणालीच्या माध्यमातून देखरेख केली जाते आणि हे आवश्यक नाही की, याचा लसीशी काही संबंध असेल. कोविड-19 लसीकरणासाठी याच प्रक्रियेचे पालन केले जात आहे.

लसीकरणानंतर एईएफआयची 7,580 प्रकरणे
मंत्री म्हणाले, देशात 16 जानेवारी 2021 ला कोविड-19 लसीकरण सुरू करण्यात आले आहे आणि 31 जानेवारी 2021 पर्यंत करण्यात आलेल्या एकुण लसीकरणापैकी एईएफआयची एकुण 7,580 प्रकरणे (0.2 टक्के) नोंदली गेली. डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, यापैकी बहुतांश अस्वस्थता, ताप, वेदना, डोकेदुखी, चक्कर येणे, डोके गरगरणे यासारखी प्रकरणे आहेत, ज्यामध्ये सर्व आपोआप बरे होतात.

12 जाणांचा मृत्यू
त्यांनी सांगितले की, 31 जानेवारीपर्यंत एकुण लसीकरणापैकी लस घेणार्‍या 14 व्यक्ती म्हणजे 0.000372 टक्क्यांना हॉस्पीटलमध्ये भरती केल्याचा आणि 12 व्यक्तींचा म्हणजे 0.000319 टक्क्यांचा मृत्यू झाल्याचा रिपोर्ट सुद्धा मिळाला आहे. या प्रकरणांची तज्ज्ञांनी चौकशी केली होती. या मृत्यूंपैकी कुणाचाही कोविड-19 लसीकरणाशी कोणताही संयोगिक संबंध नव्हता.