GDP संदर्भात गुड न्यूज, डिसेंबर तिमाहीत 0.4 टक्क्यांनी वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गेल्या अनेक दिवसांपासून मंदीचा सामना करत असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक चांगली बातमी समोर आली असून डिसेंबरच्या तिमाहीत भारताचा जीडीपी 0.4 टक्क्यांनी वाढला आहे. याचाच अर्थ असा कि, भारतीय अर्थव्यवस्था अखेर मंदीतून बाहेर पडली आहे. अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे प्रत्येकजण जीडीपीच्या या आकडेवारीची आतुरतेने वाट पाहत होता. राष्ट्रीय आकडेवारी कार्यालयाने (एनएसओ) ही आकडेवारी जाहीर केली. एप्रिल ते जानेवारी दरम्यान वित्तीय तूट 12.34 लाख कोटी रुपये आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या 1722 कंपन्यांच्या तिमाही निकालांच्या आकडेवारीवर आधारित विश्लेषणात देखील ही बाब उघडकीस आली आहे की, अर्थव्यवस्था वेगाने सुधारत आहे.

मंदीचा काळ :
कोरोनामुळे भारतीय अर्थव्यवस्थेला इतिहासात पहिल्यांदाच तांत्रिकदृष्ट्या मंदीचा सामना करावा लागला. जेव्हा कोणतीही अर्थव्यवस्था सलग दोन तिमाहीपासून घसरते तेव्हा असे मानले जाते की, ती तांत्रिकदृष्ट्या मंदीवर पोहोचली आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्था ढासळत आहे. यामुळेच जूनमध्ये या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत भारतीय अर्थव्यवस्था 23.9 टक्क्यांनी घसरली. ज्याचे कारण म्हणजे त्याकाळात करण्यात आलेले लॉकडाऊन आणि ठप्प झालेली अर्थव्यवस्था.

यानंतर पुन्हा सप्टेंबरच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी 7.5 टक्क्यांनी घसरला. सलग दोन तिमाहीत घसरणीनंतर तिसऱ्या तिमाहीत अर्थव्यवस्था सकारात्मक क्षेत्रात जाईल अशी अपेक्षा बर्‍याच एजन्सी आणि संस्थांना होती. डिसेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ‘स्टेट ऑफ इकॉनॉमी’ बुलेटिनने म्हटले की, अर्थव्यवस्था खोल दरीतून प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे सकारात्मक संकेत मिळत आहेत.