इंडोनेशियाच्या यूनिव्हर्सिटीत शिकवला जाणार ‘भाजपा’चा इतिहास

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपाच्या इतिहासाची माहिती देणारे एक पुस्तक इंडोनेशियाच्या इस्लामिक यूनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमात घेण्यात आले आहे. भारतातील सार्वजनिक निवडणुकीत भाजपाच्या लागोपाठच्या विजयाने शिक्षण क्षेत्रात या पक्षाच्याबाबत उत्सुकता निर्माण केली आहे. भारतीय जनता पार्टी- भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यकाळ, जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाची कथा, हे शांतनु गुप्ता यांचे पुस्तक अंतरराष्ट्रीय संबंध विभागात दक्षिण आशियाई अभ्यासाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समाविष्ठ करण्यात आले आहे.

विद्यापीठाचे अंतरराष्ट्रीय विभागाचे सदस्य हदजा मिन फदली यांनी म्हटले की, सार्वजनिक निवडणुकांमध्ये भाजपाचा दोन वेळा विजय झाल्याने शिक्षण क्षेत्रात या पक्षाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. नुकत्याच केलेल्या भारत दौर्‍यादरम्यान त्यांना या पुस्तकाबाबत माहिती मिळाली. ते इंडिया फाउंडेशनने आयोजित केलेल्या कौटिल्य फेलोशिप कार्यक्रमासाठी भारतात आले होते. ते म्हणाले की, इंडोनेशियाचे लोक भारतासोबतचे संंबंध आणखी मजबूत करू इच्छितात आणि यासाठी सत्ताधारी भाजपाला समजून घेणे महत्वपूर्ण आहे. आम्हाला आशा आहे की, भाजपाला सुद्धा हेच हवे आहे.

जेव्हा शांतनु गुप्ता यांना इंडोनेशियाच्या विद्यापीठात अभ्यासक्रमासाठी त्यांच्या पुस्तकाची निवड झाल्याबद्दल प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा ते म्हणाले, माझ्या कार्याला जागतिक स्तरावर ओळख मिळणे हे लेखक म्हणून खुप आनंददायी आहे. गुप्ता यांनी योगी आदित्यनाथ यांचे जीवन आणि भारतातील फुटबॉलवरील पुस्तकासह पाच पुस्तके लिहिली आहेत.