दिलासादायक ! अनेक राज्यात बर्‍या होणार्‍या रूग्णांची संख्या ‘कोरोना’ संक्रमितांपेक्षा जास्त, 2 महिन्यात कुठल्या कुठं पोहचला रिकव्हरी रेट

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मंगळवार दुपारपर्यंत देशात कोरोना व्हायरस संक्रमितांची आकडेवारी एकूण ३.४३ लाखपेक्षा जास्त पुष्टी झालेली प्रकरणे, कोविड-१९ मृत्यू ९९००, ऍक्टिव्ह प्रकरणे १,५३,१७८ आणि रिकव्हर प्रकरणे १,८०,०१२ अशीच राहिली. या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे की, देशात ऍक्टिव्ह प्रकरणांपेक्षा जास्त संख्या रिकव्हर झालेल्या लोकांची आहे. सातत्याने वाढणारा रिकव्हरी रेट सोमवारी ५१.१ टक्के होता, जो मंगळवारी ५२.५ टक्के आहे.

एकीकडे महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूची आकडेवारी सतत वाढत असून दुसरीकडे देशातील १८ राज्यांत ऍक्टिव्ह प्रकरणांपेक्षा रिकव्हर झालेल्या प्रकरणांची संख्या जास्त आहे. हे कसे घडत आहे? जगाच्या तुलनेत देखील भारतीय राज्यांचा रिकव्हरी रेट खूप चांगला दिसत आहे.

दिल्ली आणि मुंबईचा रिकव्हरी रेट सर्वात चांगला ?
जगभरातील शहरांची परिस्थिती पाहिल्यास हा दावा केला जाऊ शकतो. कोरोना विषाणू संसर्गामुळे अमेरिकेतील सर्वाधिक प्रभावित न्यूयॉर्कमध्ये कोविड-१९ ने २१.२३% रुग्ण बरे झाले. तर न्यू जर्सीमध्ये १८.८८%. याउलट दिल्लीतील रिकव्हरी दर ३८.३६% आहे, तर मुंबईत ४५.६५% आहे. ही दोन शहर देशातील सर्वाधिक बाधित शहरांच्या यादीमध्ये टॉपला आहेत.

सतत सुधारत आहे रिकव्हरी रेट
गेल्या एका महिन्यात १९ मे रोजी भारतातील कोरोना संक्रमणाबाबत रिकव्हरी दर ३८.७३% होता आणि दोन दिवसानंतरच हा दर ४०% च्या वर गेला. ३१ मे रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा दर ४७.७६% असल्याचे सांगितले आणि २ जून रोजी हा दर ४८.१९% होता. आता ५२ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला रिकव्हरी रेट १५ एप्रिलला ११.४२% होता. म्हणजेच दोन महिन्यांत तो सुधारला आहे.

राज्याप्रमाणे रिकव्हरी रेटची स्थिती
१. ज्या राज्यात संसर्ग वाढीचा दर जास्त आहे म्हणजेच ५% पेक्षा जास्त, तिथे ऍक्टिव्ह प्रकरणे अद्यापही जास्त आहेत. ती राज्ये: तामिळनाडू, दिल्ली, हरियाणा, आसाम, झारखंड, छत्तीसगड, गोवा, लडाख, नागालँड आणि मिझोरम.

२. बहुतेक राज्यांमध्ये ३% पेक्षा कमी वाढीचा दर आहे, तेथे रिकव्हरी प्रकरणे जास्त आहेत, ऍक्टिव्ह प्रकरणे कमी आहेत. ही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश: गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, चंदीगड, पुद्दुचेरी, मेघालय, अंदमान निकोबार, दादर, नगर, हवेली आणि दमण दीव.

३. ३% ते ५% दर असलेल्या राज्यात जवळजवळ समान स्थिती आहे. ज्या राज्यांमध्ये ऍक्टिव्ह प्रकरणांपेक्षा अधिक रिकव्हरी प्रकरणे आहेत- त्यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, बिहार, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, ओडिशा आणि हिमाचल प्रदेश यांचा समावेश आहे.

भारताची स्थिती इतर देशांपेक्षा चांगली कशी ?
दर दहा लाख लोकसंख्येवर पुष्टी झालेल्या केसेसच्या बाबतीत भारत बराच चांगला आहे. अहवालानुसार भारतात एक मिलियन लोकसंख्येच्या बाबतीत सुमारे २३४ प्रकरणे आहेत, तर अमेरिकेत ६,४७७, ब्राझीलमध्ये ४,००४, रशियामध्ये ३,६२५ आणि यूकेमध्ये ४,३३७ प्रकरणे प्रति मिलियन लोकसंख्येवर समोर आली आहेत.

त्याचप्रमाणे प्रति मिलियन लोकसंख्येवर मृत्यूची संख्याही भारतात केवळ ७ मृत्यू आहे. दुसरीकडे अमेरिकेत प्रति मिलियन लोकसंख्येवर ३५५, ब्राझीलमध्ये २०१, रशियामध्ये ४८ आणि यूकेमध्ये ६१४ मृत्यू नोंदवण्यात आले. ही आकडेवारी अधिक चिंताजनक आहे, कारण या देशांमधील लोकसंख्या भारतापेक्षा खूपच कमी आहे.

या आकड्यांचे कारण काय आहे ?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आयसीएमआरने चाचणी क्षमतेत बरीच वाढ केली आहे आणि आता देशात दररोज एक ते दीड लाख चाचण्या होणे शक्य झाले आहे. देशभरात ८९३ लॅब चाचण्या करत आहेत, त्यापैकी ६४६ सरकारी आहेत. १४ जूनपर्यंत देशात ५६,५८,६१४ स्वॅब नमुन्यांची चाचणी घेण्यात आली होती. मंत्रालयाने वेळोवेळी हेल्दी रिकव्हरी दरामागील प्रकरणे ओळखली आणि योग्य क्लिनिकल मॅनेजमेन्ट हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले.