‘पत्नीने सेक्सला नकार दिल्यास ती क्रुरता नाही’ : मद्रास उच्च न्यायालय

मद्रास : वृत्तसंस्था – लग्नाच्या १६ वर्षांनंतर जर पत्नी सेक्स करायला नकार देत असेल तर त्याला क्रुरता म्हणता येणार नाही असा खुलासा मद्रास उच्च न्यायालयाने केला आहे. सदर न्यायालयात घटस्फोटाचा एक खटला सुरू होता. यात पत्नी सेक्स करत नसून तिचे असे नकार देणे म्हणजे क्रुरता आहे असा युक्तिवाद करत घटस्फोटाची याचिका दाखल करण्यात आली होती. याच खटल्यावर मद्रास उच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. लग्नाच्या १६ वर्षांनंतर जर पत्नी सेक्स करायला नकार देत असेल तर त्याला क्रुरता म्हणता येणार नाही असे न्यायालयाने सांगितले आहे.

या खटल्यातील संबंधित इसमाचे लग्न १९९८मध्ये झाले होते. परंतु पत्नी वैवाहिक सुख देत नाही आणि सेक्सची मागणी केली असता दूर सारते असं त्याचं म्हणणं मांडत २०१४मध्ये इरोड कोर्टात त्याने घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. यात त्याने पत्नीचे हे वागणे म्हणजे क्रुरता आहे असा युक्तिवाद त्याने केला होता. यासाठी १९९८च्या एका निकालाचा हवालाही संबंधित इसमाच्या वकिलाने दिला होता. या निकालात पत्नीने सेक्सला नकार देणे क्रुरता असल्याचे नमुद करण्यात आले होते. परंतु उच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना मात्र सदर मामला त्या श्रेणीत बसत नसल्याचं सांगितलं.

‘वयासोबत महिलांच्या शारिरीक गरजा बदलत जातात. त्यामुळे जर एखाद्या महिलेने लग्नाच्या १६ वर्षांनंतर सेक्सला नकार दिला तर त्याला क्रुरता म्हणता येणार नाही’ असं न्यायालयाने म्हटलं होतं. आता हा इसम सर्वोच्च न्यायालयात धाव घेतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.