Video : ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार अटक टाळण्यासाठी ‘वणवण’ फिरला, 18 दिवसांत 7 राज्यांत भटकला, अखेर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ज्युनिअर सुवर्णपदक विजेता पैलवान सागर राणा हत्येप्रकरणी ऑलिम्पिकचा दुहेरी पदक विजेता सुशील कुमार याला दिल्ली पोलिसानी रविवारी (दि. 23) दिल्लीच्या मुंडका भागातून अटक केली आहे. राणा याच्या हत्येपासून सुशिल कुमार हा गायब होता. न्यायालयाने सुशील कुमारच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले होते. मात्र, गेल्या 18 दिवसांत तो अटक टाळण्यासाठी तब्बल 7 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधून फिरल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. त्याला अटक केल्यानंतर केलेल्या तपासात ही बाब समोर आली आहे.

दिल्ली पोलिसांनी रविवारी सकाळी सुशिल कुमारला मुंडका परिसरातून अटक केली. यावेळी तो दुचाकीवरून पोलिसांना गुंगारा देऊन पळ काढण्याचा प्रयत्नात होता. सागर राणाच्या मृत्यूनंतर 4 मे रोजी मध्यरात्रीपासून कुस्तीपटू सुशील कुमार फरार होता. तो सातत्याने त्याचे ठिकाण बदलत होता. तसेच 18 दिवसांमध्ये त्याने अनेकदा सिमकार्ड देखील बदलले आहेत. या काळात सुशील कुमार उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, चंदीगढ आणि पंजाब या राज्यांमध्ये फिरला. दिल्लीची सीमारेषा त्याने दोनदा पार केली. त्यामुळे एकूण 6 वेळा राज्यांच्या सीमा आणि चंदीगढ या केंद्रशासित प्रदेशाची सीमा त्याने पार केली होती. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली पोलीस उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि खुद्द दिल्लीमध्येही अनेक ठिकाणी त्याचा शोध घेण्यासाठी छापे टाकत होते. यादरम्यान, सुशिलकुमारने अटकपूर्व जामिनासाठी देखील न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीस काढली. पोलिसांनी सुशील कुमारची माहिती देणाऱ्यास 1 लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.