ओडिशातील राउरकेला येथे बनणार भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम, खेळले जाणार 2023 चे विश्वचषक सामने

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी गुरुवारी राउरकेला येथे भारतातील सर्वात मोठे हॉकी स्टेडियम उभारण्याची घोषणा केली. या दरम्यान त्यांनी सांगितले की, 20,000 प्रेक्षकांची क्षमता असणाऱ्या या स्टेडियममध्ये एफआयएच पुरुष विश्वचषक 2023 चेे सामने खेळले जातील. या घोषणेनुसार 15 एकर जागेत पसरलेले हे स्टेडियम बिजू पटनायक टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाच्या आवारात बांधले जाईल.

एका व्हिडिओ संदेशात याची घोषणा करताना पटनायक म्हणाले, “आम्ही आधीच सांगितले आहे की ओडिशा पुन्हा एकदा 2023 वर्ल्ड कप हॉकीचे आयोजन करेल.” भुवनेश्वर, राउरकेला आणि सुंदरगड येथे या स्पर्धेचे सामने खेळले जातील.

पटनायक म्हणाले, “भारतीय हॉकीला सुंदरगढच्या योगदानाबद्दल सन्मान म्हणून, मी जाहीर करतो की, आम्ही राउरकेला येथे एक नवीन आंतरराष्ट्रीय स्तरीय स्टेडियम बनवू, ज्याची प्रेक्षकांची क्षमता 20000 असेल .” ते म्हणाले, “यात सर्व आधुनिक सुविधा असतील आणि मला आशा आहे की हे जगातील सर्वोत्कृष्ट हॉकी स्टेडियमपैकी एक असेल.” हे लक्षात घेण्यासारखे आहे की अलीकडे राज्य सरकार, आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन, क्रीडा व युवा व्यवहार मंत्रालय आणि हॉकी इंडियाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाने राउरकेला येथे भेट दिली आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेतला.